जरांगे यांनी भुजबळ विरोध थांबवावा , तुम्ही एक भुजबळ पाडला तर आम्ही १६० पाडू , प्रकाश शेंडगे यांचा इशारा ….

मुंबई : लोकसभेच्या प्रचाराला अद्याप रंगात आलेली नसताना पुन्हा मराठा – ओबीसी वाद उफाळून येण्याच्या मार्गावर आहे . आज मनोज जरांगे यांनी नाशिकमध्ये येऊन छगन भुजबळ निवडणुकीत उभे राहू द्या, मग सांगतो, असा इशारा दिला आहे. यावरून ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मनोज जरांगे पाटलांवर निशाणा साधला आहे.
दरम्यानच्या काळात मराठा आरक्षणासाठी लढा सुरू असताना मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक लढत झाली होती. मात्र आता छगन भुजबळ नाशिक लोकसभेतून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर मनोज जरांगे पाटील यांनी नाशिक येथे बोलताना लोकसभेत जर भुजबळ उभे राहिले, तर मग तिथं काय भूमिका घ्यायची हे मी त्यावेळी सांगतो, असे म्हटले होते.
तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही १६० उमेदवार पाडू
मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर प्रकाश शेंडगे म्हणाले की, आम्ही सर्व जण छगन भुजबळ यांच्या पाठीमागे उभे राहू. त्यांना पाडण्याची भाषा मनोज जरांगेंकडून होत आहे. मात्र, तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही १६० उमेदवार पाडू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. नाशिकमध्ये आम्ही सर्व जण प्रचारात उतरु. संख्येच्या गणितानं बघितलं तर छगन भुजबळ यांना पाडणं अशक्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
जरांगेंनी सर्व थांबवले पाहिजे
यावेळी बोलताना शेंडगे पुढे म्हणाले की, आता हे जरांगेंनी सर्व थांबवले पाहिजे. आमच्या उमेदवारीचा तोटा आणि फायदा कोणाला होईल यासंदर्भात आमची लढाई नाही. आमची लढाई ही आरक्षणाची आहे. आरक्षणाचे तीन तेरा सर्व पक्षाच्या लोकांनी वाजवले आहेत. ईव्हीएम हॅक होऊ शकते, असे अनेकदा सिद्ध झाले आहे. व्हीव्हीपॅटचे ट्रेल मिळावेत यासंदर्भात आम्ही आयुक्तांना पत्र लिहिणार आहोत, असे देखील प्रकाश शेंडगेंनी म्हटले आहे.