MaharashtraLoksabhaNewsUpdate : आमदारकीचा राजीनामा देत निलेश लंके यांच्यासह कराळे मास्तरही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत…

मुंबई : पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके , सोशल मीडिया स्टार नितेश कराळे, माजी आमदार अमर काळे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस शनिवारी लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असतानाच या तिघांनीही प्रवेश केला आहे.
विशेष म्हणजे पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी अखेर आमदारकीचा राजीनामा देत हा प्रवेश केला आहे. विधानसभा अध्यक्षांना आपण आजच राजीनामा पाठवत असून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
लंके यांनी शुक्रवारी सायंकाळी सुपा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला संबोधताना त्यांनी विखे पाटील यांच्यावर कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष टीका केली. विखे यांनी आपल्यावरील रागापोटी पारनेरची सर्व कामे अडवली. त्यांनी मतदारसंघात दहशत निर्माण केली आहे. या दहशतीला पायबंद घालण्यासाठी आपण मैदानात उतरलो असल्याचे लंके म्हणाले.
राजीनाम्याची घोषणा करण्यापूर्वी लंके यांना रडू कोसळले. जनतेने आपणाला निवडून दिले. पण ही लढाई लढण्यासाठी मुदतपू्र्व राजीनामा देण्याची वेळ आली. आपण शरद पवारांना लोकसभा लढविण्याचा शब्द दिला होता. मधल्या वाईट काळात शरद पवारांना साथ देऊ शकलो नाही याचे दु:ख आहे. ती भरपाई करण्यासाठी आपण राजीनामा देत आहोत. मुंबईत हा राजीनामा अध्यक्षांना आजच पोहोच होईल. तसेच मेलवरही पाठवत आहोत, असे त्यांनी सांगितले.
प्रवेशानंतर काय म्हणाले नितेश कराळे ?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर नितेश कराळे म्हणाले,” मी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सिल्वर ओक येथे प्रवेश घेतला. लवकरच मी माझी भूमिका सोशल मीडियावरून जाहीर करील. केंद्रात सत्तेत असलेले मोदी सरकार पाडण्यासाठी आपण एकजुटीने लढले पाहिजे. या भूमिकेतून हा निर्णय मी घेतला आहे. सर्वसामान्य जनतेने माझ्यावर जो आतापर्यंत विश्वास दाखवला आहे.तो विश्वास यानंतरही मी कायम ठेवेल आणि यानंतरही मी माझी कणखर भूमिका युट्युब, फेसबुक, आणि इंस्टाग्राम च्या माध्यमातून मांडत राहील.
माजी आमदार अमर काळे यांचाही शरद पवार गटात प्रवेश
दरम्यान ‘नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी आमदार राजू तिमांडे, माजी आमदार सुरेश देशमुख, वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, प्रदेश सरचिटणीस किशोर माथणकर, राजाभाऊ ताकसांडे, आफताब खान, कराळे गुरुजी, सुधीर कोठारी हे उपस्थित होते.