CongressNewsUpdate : काँग्रेसच्या बैठकीची उद्या अंतिम फेरी , महाराष्ट्रातून ही ७ नावे निश्चित झाल्याची चर्चा…

नवी दिल्ली : दिल्लीत काँग्रेसच्या सुकाणू (कोअर) समितीची बैठक पार पडली. या बैठकीत देशभरातील काँग्रेसच्या महाराष्ट्रातील जागांसह ५० उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा झाली. बैठकीअंती या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून आज रात्री कोणत्याही क्षणी काँग्रेस पक्षाकडून या उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते असे वृत्त आहे . यामध्ये महाराष्ट्रातील ७ उमेदवारांचा समावेश असल्याची माहिती आहे. मात्र हे ७ उमेदवार नेमके कोण, हे अद्याप कळू शकलेले नाही. परंतु, यामध्ये प्रणिती शिंदे आणि प्रतिभा धानोरकर यांची नावे निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान राज्यातील महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप अंतिम न झाल्यामुळे अद्याप काँग्रेस किती जागा लढेल, याबाबत निश्चितता नाही. परंतु, काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्रात लोकसभेच्या १८ जागांवर उमेदवार उभे केले जाऊ शकतात. यापैकी ७ जणांची नावे निश्चित झाली असल्याचे वृत्त आहे. काँग्रेस कोअर कमिटीच्या आजच्या बैठकीला गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानातील नेते उपस्थित होते. सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत सर्व नेत्यांनी उमेदवारांबाबत चर्चा केली. कोअर कमिटीची आजची बैठक संपली असून आता उद्या दुपारी उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी पुन्हा एकदा बैठकीला सुरुवात होईल असे सांगण्यात येत आहे.
शाहू महाराज काँग्रेसच्या तिकिटावर…
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, मुंबईत आम्हाला ३ जागा हव्या होत्या, परंतु २ जागांवर आम्ही समाधानी आहोत. मेरिटवर आम्हाला पुढे जायचे आहे. प्रिया दत्त आणि एकनाथ गायकवाड ज्या जागांवर निवडून आले. तिथे आमचा दावा आहे. छत्रपती शाहू महाराजांनी आघाडीतील कुठल्याही पक्षाच्या चिन्हावर लढावे ही आमची भूमिका होती. परंतु त्यांनी काँग्रेस चिन्हावर लढायची इच्छा व्यक्त केल्यामुळे ही जागा महाविकास आघाडीने मिळून निर्णय घेतला आहे असे त्यांनी सांगितले. गुरुवारी उद्धव ठाकरे हे कोल्हापूरात आहेत. त्याठिकाणी ते शाहू महाराजांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे.
तसेच महाविकास आघाडीत कुणाला किती जागा यापेक्षा आमच्या सगळ्यांचे लक्ष्य भाजपाचा पराभव करणे हे आहे. भाजपा घाबरलेली आहे. ज्यांनी भाजपावर प्रश्नचिन्ह उभे केले ते होते त्यांनाही ते सोबत घेत आहेत. अजून खूप काही समोर यायचे आहे. आम्ही ४८ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार देणार आहोत. भाजपाला हरवायचे आहे. स्वत:ला ताकदवान म्हणवणारी पार्टी किती जणांना सोबत घेतेय हे पाहिले तर ते किती घाबरलेत हे दिसते असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील काँग्रेसच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादीत अमरावती – बळवंत वानखेडे, नागपूर – विकास ठाकरे , गडचिरोली – डॉ. नामदेव उसेंदी, सोलापूर – प्रणिती शिंदे , दरम्यान चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली जाईल. या जागेसाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यादेखील इच्छूक होत्या. मात्र, गेल्यावेळी बाळू धानोरकर यांनी मोदी लाटेतही चंद्रपूर मतदारसंघ काँग्रेसला जिंकवून दिला होता. त्यामुळे आता पक्षाने त्यांची पत्नी प्रतिभा धानोरकर यांनाच चंद्रपूरमधून उमेदवारी दिल्याचे वृत्त आहे.