सरकारला पश्चातापाची वेळ आणली नाही तर नाव बदलून ठेवील , मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाबाबत 24 तारखेची अंतिम बैठक आणि ठोस बैठक असेल, सरकारला पश्चातापाची वेळ आणली नाही तर नाव बदलून ठेवीन, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे. बैठकीनंतर सरकार विचार करेल की, अंमलबजावणी करणे परवडले असते. 24 तारखेला आम्ही राज्यातील मराठा समाजाची बैठक लावली. या बैठकीत आम्ही आमची पुढची दिशा ठरवणार आहे. या बैठकीला सर्व तज्ज्ञ हजर राहणार आहेत. समाजाकडून दोन दिवस तिथे जेवणाची सुद्धा व्यवस्था केली आहे, अशी माहिती जरांगेंनी दिली आहे.
ही प्रचंड मोठी बैठक आणि निर्णायक बैठक असणार आहे. आम्ही आचारसंहिता लागण्याच्या अगोदर निर्णय घेणार होतो , मात्र घेतला नाही. 24 तारखेला अंतिम बैठक आणि अंतिम निर्णय मराठा समाजाचा असणार आहे. एकमताने ठोस निर्णय घ्यायचा आहे. सरकार कायद्याने खेटत असेल तर, आम्ही देखील आता सरकारला कायद्याने खेटणार आहोत आणि यावर 24 तारखेला निर्णय होईल.
मनोज जरांगे पाटलांची 900 एकरमध्ये भव्य सभा
900 एकरमध्ये आमची सभा होणार आहे ती कुठे घ्यायची त्याचाही निर्णय या बैठकीत घेऊ. ठोस निर्णय झाल्याच्या नंतर सरकारला कळणार आहे की आपण सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी केली असती तर बरं झालं असतं आता उलटाच कुटाणा झाला तुम्हाला नाही पश्चाताप करायला लावला तर नाव बदलून ठेवीन, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
दरम्यान प्रकाश आंबेडकर यांच्या शब्दाचा मी सन्मान करतो, ते नेहमी जे बोलतात, ते स्पष्ट बोलतात. मात्र, राजकारण माझा मार्ग नाही.सामाजिक चळवळीतून न्याय मिळवणे, हाच माझा मार्ग आहे. सामाजिक चळवळीतून सत्तेत आणि राजकारणात नसताना ज्या गोष्टी मिळणार नाही, त्या मिळाल्या असे मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान सरकारने आमची वारंवार फसवणूक केली, आज देतो, उद्या देतो सांगून आमची फसवणूक केली, असे म्हणत त्यांनी पत्रकारांशी बोलताना , सरकारवरही निशाणा साधला आहे.