कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम, काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’त होणार सहभागी

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी सोशल मीडियावर राज्यातील जनतेला आणि कार्यकर्त्यांना उद्देशून एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आपले सर्वांचे नेते असे वर्णन केले आहे. याशिवाय सर्वांना यात्रेत सहभागी होण्याचे आवाहनही केले आहे. त्या पोस्टकडे कमलनाथ यांनी पक्षबदलाच्या चर्चांना दिलेला पूर्णविराम म्हणून पाहिले जात आहे.
कॉंग्रेसला रामराम ठोकून नाथ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी काही दिवसांपूर्वी जोर धरला होता. अर्थात, तसे घडणार नसल्याचा दावा सातत्याने कॉंग्रेसच्या इतर नेत्यांनी केला होता. मात्र, स्वत: कमलनाथ यांनी कुठले भाष्य करण्याचे टाळले. त्यामुळे त्यांच्या भूमिकेविषयी मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता. अखेर सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून नाथ यांनी तो सस्पेन्स संपवला.
राहुल यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा मार्चच्या प्रारंभी मध्यप्रदेशात दाखल होणार आहे. त्या यात्रेत अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कमलनाथ यांनी जनतेला आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे.
आपले सर्वांचे नेते राहुल यांनी रस्त्यावर उतरून अन्याय, अत्याचार आणि शोषणाविरोधात निर्णायक लढाई सुरू केली आहे, असेही त्यांनी म्हटले. राहुल यांच्या यात्रेत कमलनाथही सहभागी होणार असल्याची ग्वाही याआधीच कॉंग्रेस नेत्यांनी दिली होती.
कमलनाथ यांच्या पक्षबदलाच्या चर्चांना उधाण आले असताना राहुल यांनी त्यांच्याशी फोनवरून संवाद साधला असून त्यावेळी राहुल यांनी कमलनाथ यांना कॉंग्रेस सोडून न जाण्याची विनंती केल्याचे वृत्त आहे.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765