राहुल गांधी यांनी केला पंतप्रधान मोदींच्या जातीचा उल्लेख

अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण करत असताना स्वतःला सर्वात मोठा ओबीसी असल्याचे म्हटले होते. या खुलाश्यातून काँग्रेसकडून होणाऱ्या टीकेला मोदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते.
यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या विषयात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीचा उल्लेख केला आहे. गुरुवारी भारत जोडो न्याय यात्रेत बोलत असताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या जातीबद्दल चुकीची माहिती पसरवली. पंतप्रधान खुल्या प्रवर्गातील आहेत. ओबीसी प्रवर्गाशी त्यांचा काहीही संबंध नाही.
पंतप्रधान मोदींच्या जातीचा केला उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी प्रवर्गातील जातीत जन्मलेले नसून त्यांचा जन्म गुजरातच्या ‘तेली’ जातीत झाला आहे, अशी माहिती राहुल गांधी यांनी ओडिशा येथील झरसूगुडा येथे बोलताना दिली आहे. या जातीला ओबीसी भाजपाने २००० साली ओबीसी प्रवर्गात टाकले. त्याआधी तेली जात खुल्या प्रवर्गात होती, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, ओबीसी प्रवर्गात जन्मलेले नसल्यामुळे पंतप्रधान मोदी हे खूप आधीपासून जातीनिहाय जनगणनेला विरोध करत आले आहेत. कारण ते खुल्या प्रवर्गाचे प्रतिनिधित्व करतात, असा आरोप देखील राहुल गांधी यांनी केला आहे.
आज भारत जोडो न्याय यात्रा ओडिशामधील टप्पा पूर्ण करून छत्तीसगड राज्यात प्रवेश केला आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राहुल गांधी यांचा छत्तीसगडमधील हा पहिलाच दौरा आहे. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भाजपाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. १४ फेब्रुवारी रोजी बलरामपूर येथून ही यात्रा झारखंडच्या दिशेने प्रयाण करणार आहे.
काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या चर्चेला उत्तर देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘काँग्रेसने ओबीसी समाजाला कधीही न्याय दिला नाही. या लोकांनी ओबीसी नेत्यांचा अपमान करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. काही दिवसांपूर्वी आम्ही कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला.
पण कर्पुरी ठाकूर यांच्याबरोबर काँग्रेसने अतिशय निंदजनक असा व्यवहार केला होता. १९७० साली कर्पुरी ठाकूर बिहारचे मुख्यमंत्री झाले असताना त्यांना हटविण्यासाठी काँग्रेसचे राजकारण केले होते. काँग्रेसला वंचित-मागासवर्गी लोक पुढे आलेले चालत नाहीत.’
काँग्रेसचे माझे सहकारी हल्ली सरकारमध्ये किती ओबीसी आहेत, याची मोजदाद करत असतात. त्यांना ओबीसींची संख्या कमी असल्याची चिंता सतावते. पण मी हैराण आहे की, त्यांना माझ्याएवढा मोठा ओबीसी कसा काय दिसत नाही?’, पंतप्रधान मोदींनी हा दावा लोकसभेत करताच भाजपाच्या खासदारांनी बाकं वाजवून काँग्रेसवर कुरघोडी केली.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765