MumbaiCurrentNewsUpdate : ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांच्या पुत्राची गोळया झाडून हत्या, फेसबुक लाईव्ह दरम्यान घडला धक्कादायक प्रकार…

मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि मुंबईचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर त्यांच्याच मित्राने फेसबुक लाईव्ह कार्यक्रम सुरू असताना गोळ्या झाडून हत्या करून स्वतःही आत्महत्या केली असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. यामुळे दहिसर भागातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. अभिषेकवर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव मॉरिस असे होते.
मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस हे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत असल्याची माहिती आहे. त्यांच्यात काही वैयक्तिक वाद होते, पण ते मिटल्याने ते वर्षभरापासून एकत्र आले होते. दरम्यान मॉरिसने स्वतःच्या कार्यालयात त्याने अभिषेक घोसाळकर यांना एका कार्यक्रमासाठी बोलावले आणि या कार्यक्रमाचे फेसबुक लाईव्ह चालू असतानाच अतिशय थंड डोक्याने मॉरिसने अभिषेकवर तीन राऊंड फायार करीत त्याची हत्या केली. अभिषेकला तत्काळ रुग्णालयात दाखल केले परंतु डोक्यात आणि पोटात गोळया लागल्याने त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे या दोघांनाही याच कार्यक्रमात एकमेकांचे कौतुक केले असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व चालू असतानाच कोणाच्या ध्यानी मनी नसताना
मॉरिसने अभिषेक घोसाळकरवर समोरून गोळीबार केला. त्यांच्या दिशेने पाच गोळ्या झाडण्यात आल्या, त्यापैकी तीन गोळ्या या घोसाळकरांच्या शरिरात घुसल्या. एक गोळी घोसाळकरांच्या डोक्यात घुसली. त्यानंतर मॉरिसने स्वतःवर गोळी झाडून घेतली असता त्यात त्याचाही मृत्यू झाला. नंतर संतप्त तरुणांनी त्याच्या कार्यालयाची तोडफोड केली.
प्राथमिक माहितीनुसार मॉरिसने हा गोळीबार पैशाच्या व्यवहारातून केला असल्याचे सांगण्यात येत आहे. वर्षभरापूर्वी त्यांच्यामध्ये वाद झाला होता. पण आता तो मिटल्याने ते एकत्र आले होते.
कोण आहे गोळीबार करणारा मॉरिस?
मॉरिस नावाचा इसम दहिसर- बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत असल्याची माहिती आहे. स्थानिक राजकीय वर्तृळात मॉरिस नावाच्या व्यक्तीला स्वयंघोषित नेता म्हणून ओळखले जायचे. गणपत पाटील नगरमध्ये मॉरिस काम करत होता. शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्यासाठी त्याचा प्रयत्न चालू होता परंतु दहिसरमधून त्याला विरोध करण्यात येत होता.
गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची घटना घडलेली असतानाच हा प्रकार घडल्यामुळे मुंबईत खळबळ उडाली आहे.