Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Shiv sena MLA Disqualification Verdict : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल अखेर काही तासांवर…

Spread the love

मुंबई: राज्याच्या राजकारणात उलथापालथ घडवणाऱ्या शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल अखेर काही तासांवर आला आहे. आज ( बुधवारी) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हा निकाल देणार आहेत. या निकालावर एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आणि ठाकरे यांच्यासह 14 आमदारांचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे. शिवसेना ठाकरे गट की शिंदे गट यातील कोणाचे आमदार अपात्र ठरणार, की काही वेगळा निकाल लागणार याची उत्सुकता सर्वांना आहे.

निकाल लागण्याच्या पूर्वसंध्येला राज्यातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. विधिमंडळ सचिवालयाकडून निकालाची प्रत अंतिम करण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी रात्री तातडीची बैठक बोलावण्यात आली होती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याच्या नव्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला या वर्षा निवासस्थानी आले होते. दरम्यान, मुंबईसह राज्यभरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.

सायंकाळी चार वाजता विधानसभा अध्यक्ष विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात निकालाचे वाचन करणार आहेत. ५०० पानांच्या निकालपत्रातून महत्त्वाचे मुद्दे घेऊन एक सारांश निकाल ते वाचून दाखवतील. हा साधारण ५-१० पानांचा सारांश निकाल असेल. त्यानंतर निकालाची मूळ प्रत दोन्ही गटाच्या वकिलांना दिली जाईल.

निर्णय कायद्याला धरूनच : राहुल नार्वेकर

मुख्यमंत्री यांना अध्यक्ष कोणत्या कामासाठी भेटू शकतात याची कल्पना माजी मुख्यमंत्री ठाकरे यांना असायला हवी. आमदार म्हणून माझ्या मतदारसंघाची कामे असतात. मुख्यमंत्र्यांच्यासोबत माझी बैठक ३ तारखेला नियोजित होती, पण आजारी असल्याने मी भेटू शकलो नाही.

काल सकाळी मुंबई विमानतळावर अनिल देसाई आणि जयंत पाटील यांना भेटलो. ती काय राजकीय भेट होती का? असा सवाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला. आमदार अपात्रता प्रकरणात कुठेही कायद्याच्या तरतुदींची मोडतोड झालेली नसून माझा निर्णय कायद्याला धरूनच असणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निकालापूर्वी मुख्यमंत्री व नार्वेकर भेट; ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात

आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय देण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निःपक्षपणावर प्रश्नचिन्ह लावत उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

नार्वेकर यांनी ७ जानेवारी रोजी मुख्यमंत्री शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली याकडे सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उबाठा) वतीने आमदार सुनील प्रभू यांनी आज ही याचिका दाखल केली.

प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळेच अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी उचित कालमर्यादेत निकाल द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. पहिल्या दिवसापासून बहुमत आमच्याकडे आहे. निवडणूक आयोगानेही अधिकृत शिवसेना पक्ष व चिन्ह आम्हाला दिले आहे. मला खात्री आहे की मेरिटप्रमाणे निकाल लागेल. – असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.  

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री : आम्ही कायदेशीर सरकार तयार केले आहे. अध्यक्षांच्या निकालानंतर आम्हाला शंभर टक्के न्याय मिळणार आहे. महायुतीचे सरकार स्थिर असून सरकार कालही स्थिर होते आणि उद्याही स्थिर राहील.

निकालाच्या आधीच नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, ही बाब अत्यंत आक्षेपार्ह असून, एकप्रकारे न्यायाधीशांनी आरोपींना निकालापूर्वी भेटण्याचा हा प्रकार आहे. अशा वेळी निष्पक्ष निकालाची अपेक्षा नार्वेकर यांच्याकडून कशी करायची? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

 

शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस : ज्यांच्यापुढे केस आहे आणि ज्यांची केस आहे, ते जाऊन भेटतात इथेच संशय निर्माण होतो. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आपली प्रतिमा जपली पाहिजे.

राज्यातील सत्तासंघर्षावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर १९ महिन्यांनंतर निकाल देणार आहेत.

20 जून 2022 रोजी शिवसेनेत फूट पडली, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. राज्यातील हा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयातही लढला गेला. यानंतर मे महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना याबाबतचा निर्णय घ्यायचे आदेश दिले.

केवळ दोन आमदार सुरक्षित आहेत

शिवसेनेचे दोन आमदार आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटके वगळता इतर सर्वांवर अपात्रतेची टांगती तलवार लटकली आहे. आदित्य ठाकरे हे बाळासाहेबांचे नातू असल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार नाही, असे शिवसेनेच्या शिंदे गटाने यापूर्वीच स्पष्ट केले होते. रुतुजा लटके यांनी धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवली नसल्याने त्यांचे आमदारत्व सुरक्षित राहणार आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि निवडणूक आयोगाने धनुष्यबाण निवडणूक चिन्ह गोठविल्यानंतर अंधेरी पूर्व येथे पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवली होती, त्यामुळे त्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदार आहेत.

शिवसेना ठाकरे गटानं सर्वात आधी ज्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा उपस्थित केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भरत गोगावले, संदिपान भुमरे, संजय शिरसाट, रमेश बोरनारे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, चिमणराव पाटील लता सोनवणे आणि यामिनी जाधव यांच्या अपात्रतेबाबत निकाल दिला जाणार आहे.

शिवसेना आमदार अपात्रता निकालाच्या आधी, ठाकरे गटातील आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी…


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline
www.mahanayakonline.com

For advertising call now :
9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!