ParliamentNewsUpdate : संसदेत गोंधळ उडवून देणाऱ्या तरुणांना पास देणारे खासदार कोण आहेत ? त्याचे कारणही त्यांनी सांगितले ….

नवी दिल्ली : लोकसभेत दाखल झालेल्या सागर आणि मनोरंजन यांच्याकडे भाजपच्या खासदाराच्या नावावर लोकसभेचे अभ्यागत पास होते. पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार सागर आणि मनोरंजनाचा पास ४५ मिनिटांचा होता, पण दोघेही दोन तास थांबले. या दोन्ही व्यक्तींनी म्हैसूरचे भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या नावाने व्हिजिटर पास आणले होते. त्याचवेळी नीलम आणि अमोल हे दोघेही पासशिवाय संसद भवन परिसरात दाखल झाले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार गेल्या तीन महिन्यांपासून मनोरंजन खासदार कार्यालयाच्या संपर्कात होता आणि संसदेत येण्यासाठी पासची मागणी करत होता. दरम्यान, या घटनेमुळे भाजप खासदार प्रताप सिम्हा अडचणीत आले आहेत. त्यांनी दिलेल्या व्हिजिटर पासच्या मदतीनेच आरोपी संसद भवनात शिरले होते.
आरोपी मनोरंजन गौडा, अमोल शिंदे, सागर शर्मा आणि शिवानी सिंह प्रताप सिम्हा यांच्या पासवर संसदेत दाखल झाले आणि व्हिजिटर गॅलरीत बसले. यामुळे विरोधक सिम्हा यांच्यावर टीका करत आहेत.
खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना दिली माहिती ….
या घटनेनंतर बुधवारी संध्याकाळी सिम्हा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. मिळालेल्या माहितीनुसार, खासदार प्रताप सिम्हा आरोपीच्या वडिलांना ओळखतात. याच ओळखीमुळे आरोपी सिम्हा यांच्या संपर्कात होते. खासदार सिम्हा सांगतात की, आरोपींनी वारंवार संसद भवन संकुल पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि ते त्यांच्या पीएच्या सतत संपर्कात होते. त्यांच्याकडे या प्रकरणाची अधिक माहिती नाही.
कोण आहेत प्रताप सिम्हा?
प्रताप सिम्हा कर्नाटकातील म्हैसूर येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. सलग दोन वेळा ते या जागेवरून विजयी झाले आहेत. कर्नाटकातील भाजपच्या युवा मोर्चाचे ते माजी अध्यक्ष राहिले आहेत. राजकारणात येण्यापूर्वी प्रताप सिम्हा पत्रकार होते. 1999 मध्ये प्रताप सिम्हा यांनी एक कन्नड वृत्तपत्रातून प्रशिक्षणार्थी म्हणून पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली. वेगवेगळ्या वृत्तपत्रांसाठी त्यांनी लेखनही केले आहे.
खासदारांवर कारवाई करण्याची मागणी
या संपूर्ण प्रकरणावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यामध्ये काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी सुरक्षा त्रुटींबाबत अनेक त्रुटींचा उल्लेख केला. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, तृणमूल काँग्रेसच्या काही खासदारांनी या घटनेची तुलना महुआ मोइत्रा यांच्या हकालपट्टीशी केली आणि आरोपींना संसदेत प्रवेश करण्यासाठी पास मिळविण्यात मदत करणाऱ्या भाजप खासदारांवर कारवाई करण्याची मागणी केली.