IndiaNewsUpdate : कमाल झाली , लाख रुपये खिशात होते पण भुकेने मरण पावला भिकारी … !!

अहमदाबाद: जेव्हा आपण सर्वजण रस्त्यावर फिरतो, तेव्हा अनेक भिकारी आपल्याकडे मदतीसाठी पैसे मागतात. गुजरातमधील वलसाडमधून एका भिकाऱ्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भिकारी असल्याचे सांगणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला रविवारी वलसाड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेव्हा त्याच्याकडे 1.14 लाख रुपयांची रोकड होती. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण भूक असल्याचे सांगण्यात आले आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, अधिकारी या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. वलसाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी एका दुकानदाराने आपत्कालीन क्रमांक 108 वर डायल केला. ते म्हणाले, गांधी वाचनालयाजवळ रस्त्याच्या कडेला गेल्या काही दिवसांपासून एक भिकारी पडून होता. दुकानदाराने सांगितले की, वृद्धाची तब्येत खालावली आहे. यानंतर आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ भावेश पटेल आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी वृद्धाशी चर्चा केली. प्राथमिक तपासानंतर त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. भावेश पटेल म्हणाले, ‘तो गुजराती बोलत होता. तो वलसाडच्या धोबी तलाव परिसरात राहतो, असे त्याने सांगितले. गेल्या काही दिवसांपासून त्याची कोणतीही हालचाल होत नसल्याचे दुकानदाराने सांगितले.
भावेश पटेल पुढे म्हणाले की, ‘आम्ही त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले तेव्हा 1.14 लाख रुपयांची रोकड सापडली. रोखीत 500 रुपयांच्या 38 नोटा, 200 रुपयांच्या 83 नोटा, 100 रुपयांच्या 537 नोटा आणि 20 आणि 10 रुपयांच्या इतर नोटांचा समावेश आहे. या सर्व नोटा गोळा करून त्याच्या स्वेटरच्या खिशात छोट्या प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळल्या होत्या. वैद्यकीय अधिकार्यांसमोर आम्ही रोख रक्कम वलसाड शहर पोलिसांकडे सुपूर्द केली.
दरम्यान अधिक माहिती देताना वलसाड सिव्हिल हॉस्पिटलचे डॉ. कृष्णा पटेल म्हणाले, ‘रुग्णाला आमच्याकडे आणले असता त्यांनी चहा मागवला. आम्हाला वाटले की त्याला भूक लागली आहे आणि त्याच्या रक्तातील साखरेची पातळी कमी झाली आहे. आम्ही सलाईन टाकून उपचार सुरू केले. तासाभरानंतर त्याचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून त्याने काहीही खाल्ले नव्हते.त्या भिकाऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
केंद्र सरकारने लोकसभेत सादर केलेल्या अहवालानुसार, भारतात एकूण 4 ,13,760 भिकारी आहेत, त्यापैकी 2,21,673 भिकारी पुरुष आणि 1,91,997 महिला आहेत.