Uttarakhand Tunnel Rescue Operation : अखेर बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात यश, 17 दिवसांपासून चालू होते प्रयत्न….

उत्तराखंड मध्ये चार धाम यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी बोगदा खोदून रस्ता तयार करताना झालेल्या दुर्घटनेत अडकलेल्या कामगारांची अथक परिश्रमानंतर सुटका करण्यात यश मिळाले असल्याचे आनंददायक वृत्त आहे.
गेल्या 12 नोव्हेंबर रोजी या बोगद्यात 41 कामगार अडकले होते, त्यांची तब्बल 17 दिवसांनी सुटका करण्यात आली. बोगद्यात अडकलेल्या या कामगारांची सुटका झाली आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी रुग्णवाहिकांचा ताफा आणि तात्पुरते रुग्णालय सज्ज ठेवण्यात आले आहे.
गेल्या 17 दिवसांपासून तब्बल 41 मजूर बोगद्यात अडकून पडलेल्या या कामगारांच्या सुटकेसाठी अहोरात्र परिश्रम घेतले जात होते परंतु अडचणींची मालिका सुरूच होती. याबद्दल संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात होती.
12 नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास हे कामगार काम करीत असताना बोगद्याचा काही भाग कोसळला आणि हा बोगदा तयार करणारे हे कामगार त्यात अडकून पडले. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी लष्कराचे जवान आणि सर्व यंत्रणा परिश्रम घेत होते. दरम्यान त्यांचे जीव वाचावेत यासाठी अत्याधुनिक यंत्रणांच्या मदतीने या कामगारांसाठी अन्न-पाणी, ऑक्सिजन, मोबाईल, तणाव कमी करण्यासाठीच्या वस्तू पाठवण्यात आल्या, आता त्यांची सुटका करण्यात आली असून त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास टाकत सर्वांचे आभार मानले आहेत.