Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathaAndolanNewsUpdate : मनोज जरांगे यांचा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा हल्लाबोल , केला हा गौप्य स्फोट … !!

Spread the love

अहमदनगर  : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचा महाराष्ट्र दौरा आज संपत असून आपल्या नगरच्या दौऱ्यातही त्यांनी पुरवठा  मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडताना भुजबळांना शांत करा, नाहीतर मराठा समाज त्यांना  शांत करायला सक्षम असल्याचा इशारा देखील दिला आहे. दरम्यान छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असून, त्यांना भाजपमध्ये पलटी मारायची असल्याचा दावाही जरांगे यांनी केला आहे.

अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना हे वक्तव्य केले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्याची आज बीड जिल्ह्यात सांगता होणार असून, नऊ दिवसानंतर जरांगे पुन्हा अंतरवाली सराटी या आपल्या गावी पोहोचणार आहेत. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये मुक्कामी असलेले जरांगे थोड्याच वेळात ज्ञानेश्वरांची कर्मभूमी असलेल्या नेवासा गावी दाखल होतील. कार्तिकी एकादशीच्या दिवशी ज्ञानेश्वर मंदिरात ज्ञानेश्वरांचे दर्शन घेऊन नगरपंचायत चौकात आजची पहिली सभा घेणार आहेत. त्यानंतर शेवगाव आणि बोधेगावला सभा घेऊन सायंकाळी बीड जिल्ह्यात ते प्रवेश करतील. तसेच बीडच्या गेवराईत सभा घेतल्यानंतर बाजारतळ येथे जरांगेच्या दौऱ्याची सांगता होईल.

छगन भुजबळ यांना भाजपकडून काही ऑफर आली असेल…

दरम्यान नेवासा येथील साभेत बोलतांना जरांगे म्हणाले की, “छगन भुजबळ यांना भाजपकडून काही ऑफर आली असेल. गृहमंत्री काहीच बोलत नाही आणि त्यांना थांबवत देखील नाही. त्यामुळे मराठा समाजाला त्रास देण्यासाठी काही पलट्या मारण्याचे ठरले  आहे का?, याबाबत आम्हाला शंका येत आहे. भुजबळ यांच्यावर देवेंद्र फडणवीस काहीच बोलत नसल्याने आम्ही शंका का घ्यावी नाही. भुजबळ यांना भाजपमध्ये पलटी मारायची तर नाही ना?, कारण त्यांना पलटी मारण्याची सवय आहे. आतापर्यंत त्यांनी दहा ते पंधरा पलट्या मारल्या आहे. मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं करण्यासाठी सरकारने भुजबळांना फूस लावली नाही ना?.

यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, “मराठ्यांना आरक्षण म्हंटले की विरोध चालू झाला. अनेकजण मराठा खेकड्यासारखा असल्याचे म्हणायचे, पण आता करोडो बांधव एकत्र आले आहे. ही लाट आता थांबणार नाही. तो म्हातारा कसंही बरळत आहे. आपण कोणाचं नाव घेत नाही, त्याची लायकी देखील नाही की आपण त्याचं नाव घ्यावेत. सर्वांचं खातो आणि म्हणतो मी खात नाही. येवल्यात आमचे बोर्ड फाडले असे कळते, अजित दादाला सांगतो त्याला समजावून सांगा. अन्यथा आम्हाला शांतीचा मार्ग सोडावा लागेल, नाहीतर आमच्या नावाने खडे फोडू नका.

आरक्षणाची अशी संधी परत येणार नाही. त्यामुळे सध्या शांत रहा…

दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही सांगतो. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जर आमचे बोर्ड फाडले असतील, तर मग आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल. तुम्हाला हे जड जाईल आधीच सांगतो. चिल्लर चाळे करू नको म्हणून त्याला सांगत आहे. सरकारला देखील हे जड जाऊ शकते, गंभीर्याने घ्या, सरकारला त्रास होईल. येवल्यात मराठा बांधवांचे गावबंदीचे बोर्ड फाडल्यावरून जरांगे यांनी सरकारला ईशारा दिला आहे.भुजबळ यांचे नाव न घेता ते पुढे म्हणाले की ,  याला (भुजबळ) दोन-तीन दिवसांत शांत करा, नाहीतर मराठा शांत करायला सक्षम आहेत. फडणवीस यांनी त्याला समज द्यावी, आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करू नका. तसेच, मराठ्यांना आवाहन आहे, आरक्षणाची अशी संधी परत येणार नाही. त्यामुळे सध्या शांत रहा, आम्हाला आरक्षण येऊ द्या मग पाहतो हा कुठे पळतो. आता होर्डिंग फाडल्याचे व्हडिओ काढून ठेवा. नंतर बघू हा एकाच गल्लीत आहे, असे जरांगे म्हणाले.

नाहीतर आमचाही नाईलाज होईल

पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की, “मी शांत बसलो की, हा (भुजबळ) सुरू करतो. गोरगरिबांचा तळतळाट लागल्याने जेलमध्ये गेला. राज्य पुन्हा दुषित करण्याचे काम यांनी केले आहे. खायची किती हौस आहे. सरकारला आवाहन करतोय आणि अजित दादांना सांगतोय. हा माणूस जातीय तेढ निर्माण करतोय. याला रोखा, कार्यकर्त्यांना होर्डिंग फाडायला लावत आहे. आता मी शांत बसणार नाही, कारण मी गद्दार नाही. मराठा तुम्हाला शांत करायला सज्ज झाले आहेत. तुम्हीच त्याला पाठिंबा देताय का?, शेवटची विनंती सरकारला करतो. नाहीतर आमचाही नाईलाज होईल,” असेही जरांगे म्हणाले.

अधिवेशनाचे दिवस वाढवले…

दरम्यान २४  तारखेपर्यंत आरक्षणाचा विषय मार्गी निघणार आहे. मराठा तरुणांनी दिलेलं बलिदान वाया जाऊ द्यायचे नाही. ७  ते २२  डिसेंबरपर्यंत अधिवेशन आहे. मात्र, आता २९ पर्यंत तारीख पुढे गेल्याचे कळत आहे. बहुतेक आपल्या मुद्द्यासाठीच आणखी तारीख वाढवली आहे, असेही जरांगे म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!