NCPNewsUpdate : निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत अजित दादांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांचा पोस्टमार्टेम ….

नवी दिल्ली : निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी पक्ष कुणाचा याची गुरूवारची सुनावणी संपली असून आता पुढील सुनावणी 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अजित पवार गटाकडून बोगस शपथपत्रकं दाखल करण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटाने केला आहे. यातील काही शपथपत्रं ही अल्पवयीन मुलांच्या नावावर असल्याचा तर काही व्यक्ती मृत असल्याचाही आरोपही करण्यात आला आहे. शरद पवार गटाकडून 30 ऑक्टोबरला निवडणूक आयोगात मोठ्या प्रमाणात पुरावे सादर केले आहेत.
शरद पवार यांच्या मूळ राष्ट्रवादीतून फुटून भाजपबरोबर गेल्यानंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केल्यानंतर हा वाद निवडणूक आयोगात पोहोचला आहे. त्याची गुरूवारची सुनावणी संपली आहे.
निवडणूक आयोगात आता दीड तास सुनावणी झाली. या सुनावणीत आमच्याकडून युक्तीवाद सुरू झाला. आम्ही खूप चमत्कारीत तथ्य निवडणूक आयोगासमोर ठेवले. जे दस्तावेज याचिकाकर्त्यांनी निवडणूक आयोगात दाखल केले होते, त्यापैकी २० हजार प्रतिज्ञापत्रात त्रुटी आढळल्या आहेत. तर, ८ हजार ९०० प्रतिज्ञापत्रांची चार्ट बनवून निवडणूक आयोगात सादर केले आहेत. यामध्ये भ्रष्ट, विकृत पद्धतीने दस्तावेज आणि प्रतिज्ञापत्रात त्रुटी आढळल्या आहेत”, असा दावा सिंघवी यांनी केला.
अल्पवयीन आणि मृत व्यक्तींचेही प्रतिज्ञापत्र…
“मृत व्यक्तींचेही प्रतिज्ञापत्र यात आहेत, अल्पवयीन मुलांचंही प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. एनसीपीच्या संविधानात नसलेली पदेही दाखवण्यात आलं आहे. गृहिणी, झोमॅटोचा सेल्समन दाखवून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. याप्रकारे २४ कॅटगिरी बनवल्या आहेत. यामार्फत आम्ही स्पष्ट केलं की हे चुकीच्या पद्धतीने प्रतिज्ञापत्र बनवण्यात आले आहे. याचा अर्थ अजित पवार गटाकडे कोणतंही समर्थन नाही. आता पुढची सुनावणी २० नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे बनावट प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी अजित पवार गटावर कारवाई करण्याची आम्ही मागणी करणार आहोत. चुकीची विधानं, चुकीची प्रतिज्ञापत्र दिल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे”, असं सिंघवी म्हणाले.
गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीदरम्यान शरद पवार यांची अध्यक्षपदी झालेली नियुक्ती पक्षाच्या घटनेला धरून नसल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाने केला होता. निवडणूक आयोगात अजित पवार गटाकडून नीरज कौल आणि मणिंदर सिंग हे बाजू मांडत आहेत. तर शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत बाजू मांडत आहेत. गेल्या सुनावणीमुळे अजित पवार गटाकडून पी.ए. संगमा, सादिक अली या दोन्ही केसचा दाखला देण्यात आला होता. यासोबतच शिवसेनेतील सत्ता संघर्षाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या निकालाचाही उल्लेख वारंवार केला होता.
अजित पवार गटाची प्रतिक्रिया काय?
दरम्यान निवडणूक आयोगासमोर आजपासून नियमित सुनावणी चालू होणे अपेक्षित होते . पण काही किरकोळ शपथपत्रांमधल्या तांत्रिक बाबी समोर करून शरद पवार गटाकडून सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न केला आहे. पण आता २० नोव्हेंबरपासून सलग सुनावणी होईल, असे सूचित करण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली.