Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नावात आता औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजी नगर

Spread the love

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत विविध भागांसाठी महत्त्वाचे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यापैकी औरंगाबादच्या डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नावातील औरंगाबाद हे नाव वगळून त्या ऐवजी छत्रपती संभाजी नगर अशी दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने हा ठराव दाखल केला होता.

या शिवाय इतर ठरावांमध्ये सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण. मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये येणार. (जलसंपदा विभाग), सांगली, अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये (विधि व न्याय विभाग), पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमीन मिळणार (महसूल विभाग), फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार (परिवहन विभाग), भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन (महसूल व वन विभाग) याबाबत निर्णय घेण्यात आले.

लेक लाडकी योजना

विशेष म्हणजे या बैठकीत मुलींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “मार्च २०२३ च्या आर्थसंकल्पीय अधिवेशनात लेक लाडकी योजनेची घोषणा केली होती. त्याचा आज अंतिम प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला”, अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

“लेक लाडकी योजनेबाबत जो प्रस्ताव सादर झाला, त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने मान्यता दिलीय. १ लाख १ हजार अशी रक्कम मुलींना दिली जाणार आहे. त्यामुळे आजपासून ही योजना राज्यात लागू होईल. मूळ संकल्पना अशी होती की, मुलीचा जन्म झाल्यानंतर ती १८ वर्षाची होईपर्यत ही मदत टप्प्या टप्प्यात होणार आहे”, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली.

“मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी ही योजना आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आम्ही या योजनेची सुरुवात करत आहोत. मुलींना सक्षम करण्यासाठी ही योजना आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान याला देखील मागच्या मंत्रिमंडळात मान्यता मिळाली”, असं अदिती तटकरे यांनी सांगितलं.

लेक लाडकी योजना नेमकी काय आहे?

लेक लाडकी योजनेतून महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत केली जाणार आहे. विशेषत: पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत मुलीला जन्मानंतर ५००० रुपये दिले जातील. त्यानंतर टप्प्याटप्प्यानुसार राज्य सरकारकडून मदत केली जाईल.

मुलगी पहिली इयत्तेत गेल्यानंतर तिला ४००० रुपयांची मदत केली जाईल. त्यानंतर मुलगी सहावीत गेल्यानंतर ६००० रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून केली जाईल. तसेच मुलगी अकरावीत गेल्यानंतर 8000 रुपयांची आर्थिक मदत केली जाईल. मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिला महाराष्ट्र सरकारकडून ७५००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!