MaharashtraNewsUpdate : समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यापूर्वी हि बातमी जाणून घ्या …

औरंगाबाद : औरंगाबाद ते जालना या दरम्यान दोन टप्प्यात ५ दिवसांसाठी समृद्धी महामार्ग बंद राहणार आहे. या महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी, जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतुक १० ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान दुपारी १२ ते साडेतीन वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात २५ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर दरम्यान दुपारी १२ ते ३ यावेळात बंद राहणार आहे, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी कळविले आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. हे काम दोन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा १० ते १२ (मंगळवार, बुधवार, गुरुवार असे तीनही दिवस) तर दुसरा टप्पा २५ व २६ (बुधवार व गुरुवार असे दोनही दिवस) असेल. त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतूक १० ते १२ ऑक्टोबरला दुपारी १२ ते ३.३० वाजेपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात २५ ते २६ ऑक्टोबरला दुपारी १२ ते दुपारी ३ या वेळेत बंद करण्यात येणार आहे. इतर कालावधीत या भागातील समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरु असेल.
या कालावधीत पर्यायी वाहतुक मार्ग
समृद्धी महामार्गावरील जालना इंटरचेंज (आयसी -१४) ते सावंगी इंटरचेंज (आयसी -१६) दरम्यान समृद्धी महामार्गवरुन नागपूरकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक, निधोना (जालना) इंटरचेंज आयसी -१४ मधून बाहेर पडून निधोना एमआयडीसी मार्गे- राष्ट्रीय महामार्ग ७५३ ए (जालना-छत्रपती संभाजीनगर) मार्गे केंब्रीज शाळेपर्यंत नंतर ती उजवीकडे वळून सावंगी बायपास मार्गे सावंगी इंटरचेंज क्र.आयसी -१६ (छत्रपती संभाजीनगर) येथे समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन शिर्डीकडे रवाना होईल.
तर, समृद्धी महामार्गावरील शिर्डीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक, सावंगी इंटरचेंज क्र. आयसी -१६ (छत्रपती संभाजीनगर) येथून बाहेर पडून वर नमूद केलेल्या मार्गावरुन (विरुद्ध दिशेने) निधोना (जालना) इंटरचेंज क्र. आयसी -१४ या ठिकाणी समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन नागपूरकडे रवाना होईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी कळविले आहे.