ParliamentNewsUpdate : एमआयएमने का केला महिला आरक्षण बिलाला विरोध ? ओवेसींनी सांगितले कारण …

नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले. लोकसभेत विधेयकाच्या बाजूने ४५४ मते पडली, तर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि त्यांच्या पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केले. असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्या या पावलामागचे कारण सांगितले आहे.
इंडिया टुडेशी बोलताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले, ‘आम्ही विधेयकाच्या विरोधात मतदान केले जेणेकरून देशाला कळेल की संसदेत दोन सदस्य मुस्लिम आणि ओबीसी महिलांच्या आरक्षणासाठी लढत आहेत. विधेयकात मुस्लिम आणि ओबीसी महिलांसाठी कोणतीही तरतूद नसल्याने आम्ही विधेयकाच्या विरोधात मतदान केले.
असदुद्दीन ओवेसी यांनी विधेयकाला विरोध का केला?
असदुद्दीन ओवेसी पुढे म्हणाले की, या देशात ओबीसी समाजाची लोकसंख्या ५० टक्क्यांहून अधिक आहे, तरीही सरकार त्यांना आरक्षण देण्यास का टाळत आहे. तर राष्ट्रीय लोकसंख्येमध्ये मुस्लिम महिलांचे प्रमाण 7 टक्के आहे. संसदेत त्यांच्या प्रतिनिधीत्वाबद्दल बोलायचे झाले तर ते फक्त ०.७ टक्के आहे. आम्ही मुस्लिम आणि ओबीसी महिलांच्या आरक्षणासाठी लढत आहोत हे देशाला कळावे म्हणून आम्ही याला विरोध केला आहे.
लोकसभेत 8 तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर करण्यात आले. यावेळी बाजूने 454 तर विरोधात 2 मते पडली. स्लिपद्वारे मतदान झाले. विरोधातील दोन मते असदुद्दीन ओवेसी आणि त्यांच्या पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांची होती. महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आता गुरुवारी आज राज्यसभेत त्यावर चर्चा होणार आहे. या विधेयकात महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षणाची तरतूद आहे.