Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathaAndolanNewsUpdate : एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवारांच्या त्या व्हायरल व्हिडीओवरून वाद वाढला , मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा ….

Spread the love

मुंबई : मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील संवाद इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये कैद झाला आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. मुख्यमंत्र्यांच्या या व्हिडीओवरून त्यांच्यावर टीका होत आहे. दरम्यान त्यांनी यावर खुलासा करताना, आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद ‘सोशल मीडीया’वरून चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे असे म्हटले आहे.

दरम्यान, जालन्याच्या आंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे. त्यातच आता मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेपूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओ प्रकरणी या तिन्ही नेत्यांना ट्रोल केले जात आहे. या व्हिडिओत शिंदे आपण केवळ बोलून मोकळे व्हायचे, असे म्हणताना दिसून येत आहेत.

काय आहे या व्हिडिओत?

या व्हिडिओत मराठा आरक्षणाच्या पत्रकार परिषदेपूर्वी शिंदे, फडणवीस व अजित पवार यांच्यात नेमका कोणता संवाद झाला हे खाली वाचा…

मुख्यमंत्री शिंदे -आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं.

अजित पवार – हो……येस,

देवेंद्र फडणवीस – माईक चालू आहे.

अजित पवार –ऐकू जातंय …

आपल्या निवेदनात शिंदे यांनी म्हटले आहे की , मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे.

शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत हे अतिशय निंदनीय आहे. आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून या घटकांनी जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.

ओमराजे निंबाळकर यांचे ट्विट

हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्विट करताना ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी म्हटलेले आहे की , मराठा आरक्षणासाठी काल रात्री सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी सरकारमधील या तीन प्रमुख नेत्यांतील संवाद तरी पाहा. “आपण बोलून मोकळं व्हायचं” हे त्यांचे उद्गार मराठा आरक्षण प्रश्नी त्यांची असलेली अनास्था दर्शवित आहे.

मराठा आरक्षणासाठी सर्व समाजबांधव पोटतिडकीने राज्यभर आंदोलन करीत आहेत. अनेकांनी अन्नत्याग केला आहे. विविध माध्यमातून राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न आपला मराठा तरुण करताना दिसतो आहे. तरीही हे सरकार केवळ वेळकाढूपणा करीत आहे. एकीकडे समाज जीवन मरणाचा संघर्ष शांततेच्या माध्यमातून करीत असताना सरकारचे हे ट्रीपल इंजिन बघा किती गांभीर्याने हा विषय घेत आहेत.. आरक्षण देण्याची दानत नसेल तर तसे सांगा पण, किमान जखमेवर मीठ तरी चोळू नका. समाज आता तुमच्याकडे डोळसपणे बघतोय…

रोहित पवारांनी केला मुख्यमंत्र्यांचा निषेध

दरम्यान या सर्व प्रकाराचा निषेध करता राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांनी म्हटलेले आहे की , हा विषय फक्त मराठा आरक्षणाच्या बाबतीतला नाही. त्या व्हिडीओचा आम्ही निषेध करतो. समाजाच्या हक्कासाठी कुणीतरी उपोषणाला बसलं आहे. त्या व्यक्तीची प्रकृती खालावली आहे. अशा स्थितीत तुम्ही जर फक्त म्हणत असाल की बोलून मोकळं व्हायचं, याचा अर्थ तुम्ही त्यात राजकारण करत आहात. या सामान्य लोकांच्या प्रश्नावर तुम्ही राजकारण करत असाल तर लोकांना सगळ्या गोष्टी कळत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!