कुणबी प्रमाणपत्रावारून ओबीसी आक्रमक , आज ठरणार आंदोलनाची रूपरेषा

नागपूर : मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने विदर्भातील कुणबी संघटना आक्रमक झाल्या आहेत. नागपुरात आज विविध कुणबी संघटनांनी बैठक घेतली आणि सरकारचा एकजुटीने विरोध करण्याचा निर्णय घेतला.
मराठावाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ‘मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्र देऊन ओबीसींच्या वाट्याचे आरक्षण त्यांना दिले जाऊ नये, अशी भूमिका कुणबी समाजाने घेतली आहे. सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी शनिवारपासून लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात येईल आणि त्यानंतरही सरकारने योग्य ते पाऊल उचलले नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल’, असा इशारा अखिल कुणबी समाजाने दिला.
मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले जाऊ नये. ओबीसींमध्ये अनेक जाती आहेत. त्यात मराठा जातीचा समावेश केल्यास ओबीसींचे नुकसान होईल, असे अवंतिका लेकुरवाळे म्हणाल्या. मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी शुक्रवारी कुणबी समाजाची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यानंतर शनिवारपासून लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे.