PMNewsUpdate : अखेर इंडिया – भारत वाद आणि उदयनिधींच्या ‘सनातन धर्मा’वरील वक्तव्यावर बोलले पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : देशातील मणिपूर हिंसाचार , शेतकरी आंदोलन , महिला कुस्तीपटूंचे आंदोलन यावर एक निर्णयात्मक एक शब्दही न बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पूत्र आणि तमिळनाडूचे युवक कल्याणमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘सनातन धर्मा’वरून उदयनीधी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
उदयनिधी यांच्या वक्तव्यावर भारतीय जनता पार्टी खूप आक्रमक झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (शिवसेन – शिंदे गट) यांच्यापासून ते वेगवेगळ्या राज्यांमधील भाजपा नेत्यांपर्यंत बहुतांश लोकांनी उदयनिधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
दरम्यान, याप्रकरणी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.“उदयनिधी यांच्या सनातन धर्माविषयीच्या वक्तव्याला योग्य उत्तर द्यायला हवं”. असे वक्तव्य मंत्रिमंडळाच्या अनौपचारिक बैठकीत पंतप्रधानांनी केले आहे. त्याचबरोबर मोदी यांनी त्यांच्या मंत्र्यांना ‘इंडिया विरुद्ध भारत’ या वादावर बोलणं टाळण्याचा सल्ला दिला असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या मंत्र्यांना जी-२० बैठकीदरम्यान, दिल्लीतच राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सर्वांना जी-२० अॅप डाऊनलोड करण्यास सांगितलं आहे. तसेच मोदी यांनी मंत्र्यांना जी-२० बैठकीच्या काळात व्हीआयपी संस्कृतीपासून लांब राहायला सांगितलं आहे.
तमिळनाडूचे युवक कल्याण मंत्री उदयनिधी हे २ सप्टेंबर रोजी चेन्नई येथे प्रोग्रेसिव्ह रायटर्स अँड आर्टिस्ट असोसिएशनने आयोजित केलेल्या एका सभेला संबोधित करत होते. त्यावेळी बोलताना त्यांनी समाजातील विषमता आणि सनातन धर्म यावर भाष्य केलं. या भाषणादरम्यान, त्यांनी सनातन धर्माची मलेरिया, डेंग्यू आणि करोना विषाणूशी तुलना केली. तसेच सनातन धर्माचे उच्चाटन करण्याची भूमिकाही मांडली.
उदयनिधी म्हणाले, “सनातन धर्म हा समानता आणि सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. त्यामुळे अशा गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचं समूळ उच्चाटन करायला हवं. डास, डेंग्यू, मलेरिया आणि करोनासारख्या आजारांना विरोध करता येऊ शकत नाही. त्यांचं उच्चाटनच करायला हवं. त्याचप्रमाणे सनातन धर्माचंही उच्चाटन व्हायला हवं.”