IndiaNewsUpdate : धक्कादायक : भारतात पाकिस्तानपेक्षाही अधिक बेरोजगारी …

मुंबई : भारताला महासत्ता बनण्याच्या वलग्ना केल्या जात असताना वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या माहितीनुसार, बेरोजगारीत भारत कंगाल पाकिस्तानच्याही पुढे असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक देशांसमोर आर्थिक आव्हानंही निर्माण झाली आहेत. अनेक देशांमध्ये मंदीची भीती व्यक्त केली जात आहे. महासत्ता अमेरिका, युके, जर्मनी यासारख्या देशांमध्ये मंदीची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे जागतिक मंदीची भीतीही व्यक्त केली जात आहे. परिणामी जगभरात बेरोजगारीमध्येही वाढ झाली आहे.
कोणत्या देशात सर्वात बेरोजगारी?
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या माहितीनुसार, जगातील सर्वाधिक बेरोजगारी असलेला देश दक्षिण आफ्रिका आहे. दक्षिण आफ्रिकेत बेरोजगारीचा दर 32.6 टक्के आहे. बेरोजगारीच्या यादीत इराक दुसऱ्या क्रमांकावर आहे. इराकमध्ये बेरोजगारीचा दर 15.55 टक्के आहे. सर्वाधिक बेरोजगारीच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर बोस्निया आणि हर्जेगोविना हे देश असून येथे बेरोजगारीचा दर 13.3 टक्के आहे. या यादीत अफगाणिस्तान चौथ्या आणि स्पेन पाचव्या क्रमांकावर आहे.
भारताचा शेजारील देश पाकिस्तानमध्ये भारतापेक्षा बेरोजगारी जास्त आहे. पाकिस्तानातील बेरोजगारीचा दर 6.3 टक्के आहे, तर भारतातील बेरोजगारीचा दर 8 टक्के आहे. पाकिस्तानपेक्षा भारतात बेरोजगारांची संख्या जास्त आहे. मात्र, भारताची लोकसंख्या पाकिस्तानच्या तुलनेत 7 ते 8 पट अधिक आहे. स्पेन, इराण आणि युक्रेनसारख्या देशांच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये बेरोजगारी कमी आहे.
अमेरिकेत किती बेरोजगारी?
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत बेरोजगारीचा दर 3.8 टक्के आहे, तर ऑस्ट्रेलियामध्ये बेरोजगारीचा दर 3.7 टक्के आहे. याशिवाय चीनमधील बेरोजगारी या दोन देशांपेक्षा जास्त म्हणजे 5.3 टक्के आहे. सौदी अरेबियामध्ये बेरोजगारीचा दर 5.1 टक्के आहे. कतारमध्ये सर्वात कमी बेरोजगारी दर आहे, जिथे तो फक्त 0.1 टक्के आहे.