CMNewsUpdaate : सामाजिक सलोखा कायम ठेवा , राजकीय पोळी भाजू नका , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका

बुलडाणा : मराठा समाज फार संयमी आहे, इमानदार आहे , विश्वासू आहे. शांततेत चाललेल्या आंदोलनात दगडफेक कुणी केली ? सामाजिक सलोखा कोण बिघडवत आहे ? राजकीय पोळू भाजू नका, असा इशार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे आज तिसऱ्या दिवशीही राज्यात पडसाद उमटले आहेत. या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. तर राज्यभरात मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे राज्यात तणावाची परिस्थिती आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज 5 महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मराठा आरक्षण आणि आंदोलनाशी संबंधित या घोषणा आहेत. तसेच कुणीही विरोधकांच्या नादी लागू नका. विरोधक राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
मुंबईहून औरंगाबादला विमानाने आल्यानंतर आंदोलकांशी सामना नको म्हणून बुलडाण्याला कारने जाण्यापेक्षा ते हेलिकॉप्टरने कार्यक्रमासाठी रवाना झाले. त्यांच्या आगमनाच्या वेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची गैरहजेरी…
राज्य सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आज बुलढाणा जिल्ह्यात पार पडत आहे. आजच्या बुलढाणा येथील कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, संदीपान भुमरे, संजय राठोड, गुलाबराव पाटील हे मंत्री उपस्थित आहेत. मात्र, आजच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित नसल्यानं चर्चा सुरु झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आजच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. विशेष बाब म्हणजे अजित पवार उपस्थित राहिले नसले तरी त्यांचे बुलढाण्यातील समर्थक आमदार देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले नाहीत.
दरम्यान गिरीश महाजन यांनी या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस लेह लडाखच्या दौऱ्यावर असल्यानं ते कार्यक्रमाला आले नसल्याचं सांगितलं. तर, अजित पवार यांची प्रकृती बरी नसल्यानं ते देखील उपस्थित राहिले नसल्याचं महाजन म्हणाले. मात्र, अजित पवारांचा दौरा जाहीर करुन ऐनवेळी रद्द करण्यात आला आहे.अजित पवार यांच्या गटातील नेते देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नसल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादीचे नेते अमरावतीमधील कार्यक्रमाला गेले असल्याची माहिती आहे.
रास्ता रोकोपूर्वी मविआचे कार्यकर्ते ताब्यात
जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज निषेध म्हणून महाविकास आघाडीने आज रास्ता रोको आंदोलनाची घोषणा केली होती. सकाळी दहाच्या सुमारास प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन होणार होते. परंतु, बुलढाणा शहर पोलिसांनी बुलढाण्यातील रास्ता रोको आंदोलन होण्यापूर्वीच नेते आणि कार्यकर्त्यांना रोखले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी बुलढाण्यात आले होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं. मी तीन दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांना फोन केला होता. तू उपोषण करू नको. तुझी तब्येत ठिक नाही. आपण चर्चा करू, असं मी त्यांना सांगितलं होतं. पण तरीही त्यांनी उपोषण केलं, असं सांगतानाच आंदोलकांवर लाठीमार झाल्याचं आम्ही समर्थन करत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मोठ्या घोषणा काय?
यावेळी मुख्यमंत्र्यांनी 5 महत्त्वाच्या घोषणा केल्या. आंदोलकांवर लाठीमार केल्या प्रकरणी जालन्यातील पोलीस अधीक्षकाला आम्ही सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे, डीवायएसपीलाहा जिल्ह्यातून बाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) सक्सेना हे उद्याच जालना येथे येतील आणि दोषींना निलंबित केले जाईल, मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेची वेळ पडल्यास न्यायालयीन चौकशीही केली जाईल, आदी मोठ्या घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असंही ते म्हणाले.
अशोक चव्हाण तुम्ही काय केले?
जालन्यात दुर्दैवी घटना झाली. त्याचे मलाही दुःख झाले आहे. सर्वांनाच त्याचे दु:ख आहे. काही लोकं तिथे येऊन गेले. त्यांना लोकांनी त्यांची जागा दाखवली. ज्या लोकांनी मराठा आरक्षणाचे गळे घोटले, ते लोकं तिथे गळा काढायला गेले होते, अशी टीका करतानाच महाविकास आघाडीच्या काळात सुप्रीम कोर्टात हे आरक्षण गेले. अशोक चव्हाण तुम्ही उपसमितीचे अध्यक्ष होते, तुम्ही काय केले?, असा संतप्त सवाल त्यांनी केला. मराठा समाजाचे मूक मोर्चे निघत होते. शांततेत मोर्चे निघत होते. शिस्तबद्ध मोर्चे निघत होते. लाखोंचे हे मोर्चे होते. यावेळी माजी मुख्यमंत्र्यांनी या मोर्चाला ‘मुका मोर्चा’ म्हणून संबोधले होते, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली.
कोणीही माझा बाल बाका करू शकत नाही…
जेव्हापासून मी मुख्यमंत्री झालो, तेव्हापासून आज सरकार जाणार, उद्या जाणार असं चालू झाले आहे. आता सगळे ज्योतिषी बंद झाले. सरकार पडता पडता, अजितदादा आमच्यासोबत आले. आता म्हणतात, मुख्यमंत्री बदलणार. मी काय तुमचं घोडं मारलंय? जनता माझ्याबरोबर आहे, तोपर्यंत कोणीही माझा बाल बाका करू शकत नाही, असंही ते म्हणाले.