MarathaReservationUpdate : मोठी बातमी : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज, धुळे – सोलापूर मार्गावर वाहनांची जाळपोळ …

जालना : अंतरावाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणासाठी गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे. आंदोलनस्थळी दगडफेक झाली त्यानंतर पोलिसांनी हवेतगोळीबार करण्यात आला असल्याचे वृत्त आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून शरद पवार छत्रपती संभाजी राजे यांच्यासह अनेक नेत्यांनी या लाठी हल्ल्याचा निषेध केला आहे.
गेल्या २९ ऑगस्टपासून मराठा मार्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह १० जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला. पण त्याला विरोध झाल्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. तर आंदोलकांनी दगडफेक केली गेली. त्यानंतर आक्रमक आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला.
धुळे-सोलापूर महामार्गावर वाहनांची जाळपोळ
जालन्यात लाठीचार्जच्या घटनेमुळे मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. मराठा आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर जाळपोळ केली आहे. आंदोलकांनी काही वाहनांना जाळून टाकलं. तसेच महामार्गावर दगडफेक देखील झाली. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सर्व आंदोलकांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, लाठीचार्जमध्ये काही महिला आणि पुरुष पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
शरद पवार यांचा गृहमंत्र्यावर निशाणा
या घटनेवर शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. राज्याच्या गृहमंत्र्यांच्या मनात काही घटकांबद्दल मनामध्ये जी भावना असेल ती भावना पोलिसांच्या कृतीतून व्यक्त होत असते. ते व्यक्त झालेले चित्र आपण जालन्यात पाहिले. त्यामध्ये पोलिसांना काय दोष द्यायचा. याची पूर्ण जबाबदारी राज्य सरकारची, गृह खात्याची जबाबादारी घेणाऱ्यांची आहे, मी याचा तीव्र निषेध करतो. हे थांबवण्यासाठी त्या लोकांना तिथे जाऊन धीर द्यावं लागेल”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
‘बळाचा वापर ही राज्याच्या गृहमंत्र्यांची सूचना’
“एकदा तुम्ही चर्चा केल्यानंतर लाठीहल्ला करण्याची काही आवश्यकता नव्हती. पण हल्ली विशेषत: सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रश्नांसंबंधित कोणताही प्रश्न असले तर ते रस्त्यावर आले तर बळाचा वापर ही राज्याच्या गृहमंत्र्यांची सूचना असावी. राज्याच्या गृहमंत्र्यांच्या मनात काही घटकांबद्दल मनामध्ये जी भावना असेल ती भावना पोलिसांच्या कृतीतून व्यक्त होत असते. ते व्यक्त झालेले चित्र आपण जालन्यात पाहिले”, असं शरद पवार म्हणाले.
संभाजीराजे काय म्हणाले?
“अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला. शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस पांगवण्यासाठी गोळीबार केला. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कुणाच्या आदेशाने हे सर्व घडले याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ खुलासा द्यावा, अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल”, असा इशारा संभाजीराजे यांनी दिला.
“मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणूकीमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वथा राज्याचे गृहमंत्री व सरकार जबाबदार असेल”, असं संभाजीराजे म्हणाले.
अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सराटी अंतरवालीअशोक चव्हाण यांनी दिलेली प्रतिक्रिया, ता.अंबड, जि. जालना येथे सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन अमानुष पद्धतीने मोडून काढण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचा मी तीव्र निषेध करतो. आंदोलनावर पोलिसांनी बेछूट लाठीमार करून अश्रुधुराचाही वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या व्हीडीओतून बळाचा अतिरेक स्पष्टपणे दिसून येतो.
मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारने समाजाचा अंत पाहू नये. या गंभीर प्रश्नावर केवळ वेळकाढूपणा होत असल्याने समाज संतप्त आहे. बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडता येणार नाही. त्याऐवजी मराठा आरक्षण कसे देणार, याबाबत राज्य सरकारने स्पष्ट भूमिका जाहीर करावी आणि ठोस पावले उचलावीत. नेमके हेच केले जात नसल्याने मराठा समाजातील आक्रोश तीव्र होतो आहे.
मराठा आरक्षण देण्यासाठी इंद्रा साहनी व अन्य न्यायालयीन प्रकरणातील ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा शिथिल करण्याची आवश्यकता आहे. याकडे वारंवार लक्ष वेधल्यानंतरही केंद्र व राज्य सरकार काहीच करत नसल्याने मराठा समाजावर आरक्षणासाठी पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ ओढवली आहे.