Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RahulGandhiNewsUpdate : उद्योगपती अदानी यांच्या चौकशीसाठी जेपीसीची राहुल गांधी यांची मागणी

Spread the love

मुंबई : ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टच्या वतीने काँग्रेसने गुरुवारी अदानी समूहावर टीका केली. त्यांच्यावरील नव्या आरोपांवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारला फैलावर घेत अदानी समूहावर नवे आरोप केले. पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की, दोन प्रमुख जागतिक वृत्तपत्रांनी अदानी प्रकरणात अतिशय महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. मॉनिटरिंग कंपनी सेबीवर आरोप करत राहुल गांधी म्हणाले, “सेबीने तपास केला, पण अदानीला क्लीन चिट देण्यात आली. काहीतरी गडबड आहे हे अगदी स्पष्ट आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपनीत चीनी व्यक्तीची गुंतवणूक आहे, त्याची संसदेच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. अदानी यांच्या कंपनीच्या माध्यमातून १ अब्ज डॉलर्स हे भारताबाहेर गेले आणि नंतर पुन्हा अदानी यांच्या कंपनीत गुंतवण्यात आले असाही आरोप त्यांनी केला.

राहुल गांधी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत . यावेळी पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, अदानी यांच्या कंपनीत काही लोकांनी छुपी गुंतवणूक केली आहे. जवळपास १ अब्ज डॉलर्स हे अदानी यांच्या कंपनीच्या माध्यमातून बाहेर वेगवेगळ्या देशात गेले आणि नंतर ते परत आले. त्या पैशातूनच आता अदानी हे विमानतळ आणि इतर प्रकल्प राबवत आहेत. हा पैसा कुणाचा आहे? अदानींचा आहे की आणखी कुणाचा? दुसऱ्या कुणाचा असेल तर ते कोण आहेत याची चौकशी करावी.

विनोद अदानी हे या मागचे मास्टरमाईंड असून ते गौतम अदानी यांचे बंधू आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ते म्हणाले की, अदानी यांच्या कंपनीमध्ये नासर अली शाबान अहली आणि चांग चुंग-लिंग यांची गुतंवणूक आहे. अदानी जर भारतात विकास प्रकल्प राबवतात तर त्यांच्या कंपनीमध्ये चीनी व्यक्तीचा पैसा कसा? अदानींची कंपनी ही संरक्षण क्षेत्रात काम करत आहे, मग चीनी व्यक्तीची गुंवतणूक त्यामध्ये कशी काय? गौतम अदानी यांच्या कंपनीमध्ये दोन व्यक्तींची गुंतवणूक असून ती का आहे याची चौकशी केली पाहिजे.

पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान मोदी गप्प का आहेत, का ते याची चौकशी का होऊ देत नाहीत. जी-20 बैठकीपूर्वी भारताची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, पंतप्रधान मोदींनी कारवाई करावी, या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.” अदानी प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत ? तसेच ईडी, सीबीआय हे अदानी यांची चौकशी का करत नाहीत असा सवालही त्यांनी केला. हिंडनबर्ग नंतर आता OCCRP या अमेरिकन संस्थेने भारतातील अदानी ग्रुपला पुन्हा लक्ष्य केलं आहे. अदानी समुहाने आपल्याच शेअर्समध्ये मॉरिशस कनेक्शन वापरुन अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करुन कृत्रिमरित्या आपल्या शेअर्सचे भाव वाढवल्याचा ओसीसीआरपी चा आरोप आहे. आदानी समुहाने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!