CourtNewsUpdate : न्यायाधीशांनी भर कोर्टातच दिला राजीनामा !! असे काय घडले ?

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश रोहित देव यांनी भर कोर्टरूममधे राजीनामा दिल्याची घटना घडली आहे. आज सकाळी नागपुरातील खंडपीठात कोर्टरूममधे आल्यानंतर त्यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. गुरूवारी त्यांची मुंबई उच्च न्यायालयातून अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली कऱण्यासंदर्भात सूचना प्राप्त झाली होती. त्यावर व्यथित होऊन रोहित देव यांनी राजीनामा दिला असावा असे वृत्त आहे. अशाप्रकारे, एखाद्या न्यायाधीशाने खुल्या न्यायालयाच्या खोलीत राजीनामा देण्याची ही पहिलीच घटना असावी.
न्यायमूर्ती रोहित देव हे शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणेच नागपूर खंडपीठाच्या कोर्ट रूममध्ये आले आणि त्यांनी कोर्टरूममधल्या उपस्थितांसमोर आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या घोषणेनंतर कोर्टरूममधील सर्वजण आश्चर्यचकित झाले. मी कोर्ट रूममधल्या उपस्थितांची दिलगिरी व्यक्त करतो, माझ्या वागण्यामुळं कुणाचं मन दुखावलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असं म्हणून न्यायमूर्ती रोहित देव तिथून निघून गेले.
न्यायमूर्ती रोहित बी देव यांनी प्रोफेसर जीएन साईबाबा यांची नक्षलवाद्यांशी संबंधित खटल्यातून गेल्या वर्षी निर्दोष मुक्तता केली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना निलंबित केले. न्यायमूर्ती रोहित बी देव यांची २०१७ मध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली. न्यायाधीश म्हणून नियुक्तीपूर्वी ते राज्याचे महाधिवक्ता होते. ते उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरलही राहिले आहेत. रोहित देव ४डिसेंबर २०२५ रोजी निवृत्त होणार होते, परंतु त्यांनी सुमारे अडीच वर्षांपूर्वी पदाचा राजीनामा दिला आहे.
अलीकडेच, न्यायमूर्ती रोहित बी देव यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने समृद्धी एक्स्प्रेस वे प्रकल्पावर काम करणाऱ्या कंत्राटदारांविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाई रद्द करण्याच्या महाराष्ट्र सरकारला अधिकार देणाऱ्या सरकारी ठरावाला स्थगिती दिली.