ShivsenaNewsUpdate : शिवसेना आणि धनुष्य बाण कुणाचा ? आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेचा अधिकृत दर्जा देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील उद्धव गटाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे नाव आणि चिन्ह वापरण्याची परवानगी दिली होती. आयोगाच्या या निर्णयाला उद्धव गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
उद्धव ठाकरे गटाचे वकील अमित आनंद तिवारी यांनी याचिका दाखल करून तातडीने सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली. निवडणूक आयोगाचा निर्णय बाजूला ठेवण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. त्यावर न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी ३१ जुलै ही तारीख १० जुलै रोजी निश्चित केली होती. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस. नरसिंह यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या याचिकेत निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकेत म्हटले आहे- अशा वादाच्या परिस्थितीत आयोगाने प्रतीक आदेशाच्या पॅरा १५ अंतर्गत आपले कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरले आहे. आयोगाने आपली घटनात्मक स्थिती कमकुवत करण्याचे काम केले आहे. उद्धव गटाला शिवसेनेच्या मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. मात्र, २२ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने एकनाथ शिंदे आणि निवडणूक आयोगाला उद्धव गटाच्या याचिकेवर दोन आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले होते. प्रत्युत्तरात, निवडणूक आयोगाने सांगितले की त्यांनी आपल्या क्षमतेनुसार आदेश दिले आहेत. शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि पक्षाच्या चिन्हाचा दर्जा देणेच योग्य होते.