Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Assembly Update : पावसाळी अधिवेशनाला वादळी सुरुवात , विरोधक आक्रमक , दिवसभरासाठी कामकाज तहकूब

Spread the love

पायऱ्यावरील आंदोलनाला राष्ट्रवादीची दांडी, ठाकरे यांची सेना आणि काँग्रेसची जोरदार घोषणाबाजी

मुंबई : राज्यातील पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली असून विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले. यात काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या आमदारांनी खोके सरकार हाय हाय अशी जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला मात्र या आंदोलनाला राष्ट्रवादीच्या आमदारांनी दांडी मारल्याचे दिसत होते. त्यामुळे राष्ट्रवादीतील फूट उघडपणे दिसून आली. दरम्यान काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. दरम्यान संसद आणि विधिमंडळातील दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून आज दिवसभराचं कामकाज तहकूब करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत आठ नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. या सर्व पार्श्वभूमीवर या अधिवेशनाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. राष्ट्रवादीचे आमदार काय भूमिका घेणार याकडे आता राज्याचं लक्ष लागले आहे. अधिवेशनाला सुरुवात केल्यानंतर सर्वप्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या मंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली. त्यानंतर विधिमंडळाच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी दालनात प्राप्त झालेले सर्व निवेदन नाकारल्याची माहिती दिली तेंव्हा विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

बाळासाहेब थोरात यांनी वेधले सरकारचे लक्ष

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देण्यात आले. यावेळी बोलताना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. राज्यात अत्यंत कमी प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष नसल्याचे थोरात यांनी सांगितले. राज्यातील पावसाची स्थिती गांभीर्याने पाहायची गरज आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे.आणि सरकारी टोळी हफ्ते वसुली करत आहे. आणि दुर्दैवाने सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कुणाचे लक्ष नाही. मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप, दिल्ली वारी यामुळे सरकारचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. त्यामुळे सभागृहात स्थगन प्रस्ताव आणून त्यावर चर्चा करावी अशी मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर

त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. विरोधी पक्षाने जो प्रश्न उपस्थित केला त्याचे शासनाला गांभीर्य आहे. आयएमडीचा अहवाल सरकारला प्राप्त झालाय. येत्या आठवडाभरात चांगला पाऊस दाखवला आहे. पेरण्या होऊ शकल्या नाहीत, दुबार पेरणीची वेळ आली तर सरकारने नियोजन केले आहे. १० हजार कोटी रुपये गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांसाठी मदत केली आहे. काही शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण नाही म्हणून त्यांना मदत मिळाली नाही. तेदेखील काम सुरू आहे. कुठल्याही परिस्थितीत हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, बोगस बियाणे, खते याविरोधात आणखी कडक कायदा करण्याचा सरकारचा विचार आहे. जी काही बोगसगिरी होतेय तो दखलपात्र गुन्हा केला जाईल. यातील दोषींना जामीन मिळणार नाही असा कठोर तरतुदी या कायद्यात करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बैठक घेतली असून योग्य त्या उपाययोजना आणि निर्णय घेतल्याची माहिती फडणवीसांनी सभागृहाला दिली.

मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि बजोरिया यांना अपात्र करा

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाने एक मोठा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाने विधीमंडळ सचिवांना पत्र पाठवून तीन आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि आमदार विप्लव बजोरिया यांना अपात्र करण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. त्यामुळे या तिन्ही आमदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच या आमदारांच्या अपात्रतेवर काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सासूमुळे वाटणी झाली आणि सासू वाट्याला आली, विरोधक आक्रमक

सासूमुळे वाटणी झाली आणि सासू वाट्याला आली, 50 खोके, एकदम ओके… अशी जोरदार घोषणाबाजी विरोधकांनी आज केली. आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. घटनाबाह्य कलंकित सरकारचा धिक्कार, असो अशा आशयाचे बॅनर यावेळी झळकविण्यात आले होते. मात्र, आमच्याकडे १९ आमदारांचं बळ आहे म्हणणाऱ्या शरद पवार यांच्या गटाचा एकही आमदार पायऱ्यावर उपस्थित नव्हता.

विरोधी पक्ष नेता कोण ?

राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सत्तेत सहभागी झाल्याने शरद पवार यांचा गट अल्पमतात आला आहे. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे जाणार आहे. या पदासाठी काँग्रेसमधील पाच नेत्यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे या पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार त्यांचा विरोधी पक्षनेता आणि विधान परिषदेची विरोधी पक्षनेता असे सूत्र ठरलेले आहे. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आज कोणत्या नावाची विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा करतात आणि काँग्रेसने कुणाच्या नावाची शिफारस केली आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!