GSTNewsUpdate : कोणत्या वस्तूवर जीएसटी वाढवला आणि कमी केला ? ते पहा ..

नवी दिल्ली : जीएसटी परिषदेने ऑनलाईन गेमिंग, हॉर्स रेसिंग आणि कॅसिनोवर २८ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण मूल्यावर जीएसटी वसूल केला जाईल. जीएसटी कौन्सिलच्या ५० व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर हा नियम लागू होणार आहे.
जीएसटी कौन्सिलने सिनेमाच्या तिकिटांसह पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक्ससारख्या खाद्यपदार्थांवर जीएसटीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असून आता या सर्व गोष्टी संमिश्र पुरवठा म्हणून गणल्या जातील आणि मुख्य पुरवठा म्हणजेच सिनेमाच्या तिकीटाप्रमाणेच कर आकारला जाईल. म्हणजेच सिनेमागृहातील रेस्टॉरंटमधील खाण्यापिण्यावर आता ५ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे, जो पूर्वी १८ टक्के होता. जीएसटी कौन्सिलने अपीलीय न्यायाधिकरणाच्या स्थापनेलाही मान्यता दिली आहे.
जीएसटी कौन्सिलच्या बैठकीबाबत माहिती देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, चार वस्तूंचे जीएसटी दर कमी करण्यात आले आहेत. फिश पेस्टवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे. झारीवरील GLT दरही कमी करण्यात आले आहेत. यावरील जीएसटी सध्याच्या १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत कर्करोगावरील औषधांच्या आयातीवरील जीएसटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच विशेष औषधांसाठी औषध आणि अन्नावरील IGSTही रद्द करण्यात आला आहे. जीएसटी कौन्सिलच्या या निर्णयामुळे कॅन्सरवरील औषधाची आयात स्वस्त होईल.
जीएसटी कौन्सिलमध्ये पीएमएलए कायद्यांतर्गत जीएसटी आणण्याचा मुद्दाही राज्यांनी उपस्थित केला. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, दिल्ली पंजाबच्या अर्थमंत्र्यांची इच्छा आहे की यावर आधी चर्चा व्हावी. मात्र सर्व अजेंड्यावर चर्चा झाल्यानंतर त्यावर चर्चा होऊन राज्यांच्या अर्थमंत्र्यांना स्पष्टीकरण देण्यात आले.