CourtNewsUpdate : राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या मुद्यावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली : महाविकास आघाडीच्या काळापासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या मुद्यावर उद्या मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वातील खंडपीठ या प्रकरणी सुनावणी करेल. त्यात या आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.
महाविकास आघाडी सरकारने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे १२ जणांची नावे पाठवली होती. पण कोश्यारी यानी त्यांना मंजुरी दिली नव्हती. त्यानंतर राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने नवी यादी राज्यपालांना पाठवली होती. पण जुनी यादी रद्द करून नव्या यादीला मंजूर देण्याच्या मुद्यावर एका याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. या याचिकेवर आता उद्या सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनजंय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होईल.
गेल्या वर्षी सप्टेंबर २०२२ मध्ये न्यायालयाने या आमदारांच्या नियुक्तीला स्थगिती दिली होती. त्यावर न्यायालय कोणती भूमिका घेते, हे पाहणे औत्सुक्यांचे ठरणार आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवरून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता. ठाकरेंनी या प्रकरणी कोश्यारींना खरमरीत पत्रही लिहिले होते. पण कोश्यारी यांनी अखेरपर्यंत हा मुद्दा निकाली काढला नव्हता. या प्रकरणात न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.