MaharshtraPoliticalUpdate : मंत्रिमंडळ विस्ताराचा तिसरा पाळणा लवकरच हलणार की पुन्हा लांबणार ? नव्या मंत्र्यांच्या खाते वाटपावरूनही मतभेद !!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मागून येऊन मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपशी शिवसेनेत बंडखोरी करून आधी घरोबा केलेल्या शिंदे गटातील आमदार नाराज झाले आहेत. त्यांची ही नाराजी दूर करण्यासाठी शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार लवकरच करण्याच्या हालचाली सुरु झाल्या असल्याचे वृत्त आहे. यामध्ये आपलाच नंबर लागावा यादृष्टीने शिंदे गटाचे आमदार जोरदार प्रयत्न करीत आहेत. नव्या विस्तारात भाजपला त्यांना पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांचाही विचार करावा लागणार आहे.
दरम्यान राष्ट्रवादी पक्षात मोठे बंड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना पक्षातील ४३ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे ३ खासदारही अजित पवार यांच्यासोबत असल्याचं सांगण्यात येत आहे. एकीकडे अजित पवारांच्या रूपात राष्ट्रवादी काँग्रस सत्तेत सभागी झाली असताना दुसरीकडे मंत्रीमंडळ विस्ताराची वाट पाहत असलेल्या शिवसेनेत चलबिचल सुरू झाली आहे. ही चलबिचल दूर करण्यासाठी लवकरच आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. युतीतील ९० टक्के इच्छुकांची नाराजी दूर करण्यात यश आल्याचं बोललं जात आहे.
दुसरीकडे विधानसभेच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिसा जरी केल्यामुळे त्यांच्याकडील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आणि त्यांच्या निर्णयानंतर विस्तार करायचा की , पावसाळी अधिवेशनापूर्वीच विस्तार करायचा यावरून पक्षामध्ये मतभेद असल्याच्याही चर्चा आहेत. तसेच नव्या विस्तारात सध्याच्या मंत्र्यांचे राजीनामे घेऊन नव्यांना संधी द्यायची त्यांना कायम ठेवून नवे मंत्री सामील करायचे याचाही अंतिम निर्णय होताना दिसत नाही. कारण विद्यमान मंत्र्यांनी कोणत्याही शर्तीवर राजीनामे देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यमान मंत्रिमंडळातील भाजपच्या मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागतील का ? यावर विचार केला जात असल्याचे समजते. भाजपच्या सूत्रांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांना कुठले खाते द्यायचे यावरूनही मतभेद असल्याचे चित्र आहे. मात्र असे असले तरी अजित पवारांसोबत शपथ घेतलेल्या मंत्र्यांच्या खातेवाटपावर उद्यापर्यंत शिक्कामोर्तब होणार असल्याचे वृत्त आहे.