SportsNewsUpdate : आशियाई कबड्डी स्पर्धेत भारताची इराणवर दमदार मात , भारताने विजेतेपद राखले

नवी दिल्ली : आशियाई कबड्डी स्पर्धेत सलग दोन सामन्यात इराणला पराभूत केले. शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात इराणला दहा गुणांनी पराभूत करीत भारताने विजेतेपद राखले.भारताने या स्पर्धेत एकही लढत गमावली नाही. इराणने काही नवोदित खेळाडूंना संधी दिली होती. भारतीयांनी प्रो कबड्डी गाजवलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने संघाबाहेर ठेवले होते. अखेरच्या साखळी लढतीत भारतास चार गुणांनीच विजय लाभला होता, पण अंतिम लढतीत भारताने ४२-३२ अशी बाजी मारली
इराणच्या संघाने पवन शेरावतची सुरुवातीच्या चढाईतच पकड करीत आपली तयारी दाखवली. मात्र यामुळे दोघा संघातील चुरस वाढली.यावेळी इराण ३-१ आघाडीवर होते. त्यानंतर त्यांनी कधीही आघाडी राखली नाही. नितेश कुमार आणि परवेश भैनस्वाल यांच्या पकडींनी भारतास आघाडीवर नेले.विशष म्हणजे भारतीयांनी दहा मिनिटांतच लोण देत १०-४ अशी आघाडी घेतली. त्यानंतर अर्जुन देशवालने एकाच चढाईत तिघांना बाद केल्यावर इराणचे खेळाडू चिडले. प्रतिस्पर्धी संघात बाचाबाची झाली आणि पुन्हा दोन्ही संघांना ताकिद मिळाली. मात्र याचा परिणाम खेळावर झालेला नाही, हे दाखवताना पवनने वेगवान आक्रमण केले. भारताने विश्रांतीच्या वेळी १२ गुणांची आघाडी घेतली होती.
बुधवारच्या साखळी लढतीप्रमाणेच निर्णायक सामन्यातही भारतीयांच्या खेळातील विश्रांतीनंतर कमी झाला. चौदा मिनिटे असताना १९ गुणांची आघाडी होती. मात्र शादलोऊ याने चित्र बदलले. डावा कोपरारक्षक असलेल्या शादलोऊने लागोपाठच्या दोन चढायात मिळून पाच जणांना बाद करीत भारतावर लोण दिला. भारताची आघाडी वेगाने कमी होण्यास सुरुवात झाली. दोन मिनिटे असताना भारताचे तिघे मैदानात होते. शादलोऊ तिघांना बाद करून बाहेर पडणार असे वाटत असतानाच नितेशने त्याची पकड केली. मात्र पुन्हा चित्र बदलले. एक मिनिट असताना शादलाऊला केवळ अस्लमलाच बाद करायचे होते. मात्र तो कबड्डी… कबड्डीच बोलत नव्हता. भारतीयांनी हे लक्षात आणल्यावर त्याला बाद ठरवण्यात आली. त्याची सुपर टॅकल झाल्याचे दाखवत भारतास दोन गुण देण्यात आले. भारताची आघाडी पाच गुणांपर्यंत कमी होण्याचा धोका असताना दहा गुणांची झाली. काही वेळातच सामना संपल्याची शिट्टी वाजली आणि भारतीयांनी एकच जल्लोष केला.