Maharashtra : ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात फितूर होऊन खोटी साक्ष , अनुदान वसुलीचे न्यायालयाचे आदेश

सांगली : अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्यानुसार दाखल खटल्यामध्ये फितूर होऊन शपथेवर खोटी साक्ष दिल्याबद्दल फिर्यादीवर कारवाई करण्याबरोबर शासनाकडून देण्यात आलेले अनुदान वसूल करण्याचे आदेश अतिरिक्त सत्र तथा तदर्थ न्या. श्रीमती एम.एम.पाटील यांनी गुरुवारी दिले. सरकारपक्षाकडून अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील श्री. रियाज एस. जमादार यांनी युक्तीवाद केला.
प्रदीप रास्ते (वय २६ रा. बलगवडे) याने २६ सप्टेंबर २०२० रोजी तासगाव पोलीस स्टेशनमध्ये सौरभ शिंदे याच्याविरुद्ध फिर्याद दिली होती. त्यामध्ये फिर्यादी हे अनुसुचित जाती जमातीचे आणि संशयित हे सवर्ण असून त्यांनी फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली होती. फिर्यादीची पत्नी सोडविण्यास आली असता तिलाही ढकलून जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दिली होती.
फिर्यादीने पोलीस ठाणे मध्ये दिलेल्या फिर्यादीप्रमाणे न्यायालयामध्ये शपथेवर सरतपास दिला त्यामध्ये खरी वस्तुस्थिती सांगितली परंतु त्यानंतर फिर्यादी हा आरोपीशी संगनमत करुन आरोपीस मदत करण्याच्या हेतूने उलटतपासामध्ये पूर्वी दिलेली फिर्याद व शपथेवरील जबाबाच्या परस्पर विरोधी जबाब दिला. तसेच सरतपासातील शपथेवरील स्वतः सांगितलेली कथने देखील खोटी असल्याचे उलटतपासात मान्य केले आहे. यावरुन फिर्यादीने न्यायालयासमोर शपथेवर खोटी साक्ष दिल्याचे शाबित झाले. यामुळे रास्ते याच्यावर कारवाई करण्याबरोबरच शासनाकडून देण्यात आलेले दीड लाखाचे अनुदान वसूल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.