IndiaNewsUpdate : मोदींनी “नेहरू मेमोरियल”चे नाव बदलून ठेवलेले “प्राईम मिनिस्टर्स म्युझियम … “

नवी दिल्ली : काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी जणू मोहीमच सुरु केली आहे .त्याचाच एक भाग म्हणून आता थेट देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं ज्या घरात शेवटपर्यंत वास्तव्य होतं, त्याच्याच नावातून पंडित नेहरूंचं नाव वगळण्यात आलं आहे. गेल्या वर्षीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ठिकाणी ‘पंतप्रधान संग्रहालया’चं उद्घाटन केलं होतं. त्यानंतर अवघ्या वर्षभरातच हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वारंवार मोदी सरकारवर इतिहास बदलण्याचा, नावं बदलून काँग्रेसच्या खुणा मिटवण्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे . .
पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाल्यानंतर राजधानी दिल्लीत तीन मूर्ती कॉम्प्लेक्समध्ये १६ वर्षं वास्तव्यास होते. याआधी हे निवासस्थान भारताच्या कमांडर इन चिफचे होते. २७ मे १९६४ रोजी पंडित नेहरूंचे निधन झाल्यानंतर तत्कालीन केंद्र सरकारने हे निवासस्थान पंडित नेहरूंनाच समर्पित करून त्या ठिकाणी त्यांचे संग्रहालय आणि ग्रंथालय सुरू केले. पुढे नेहरूंच्या ७५व्या जयंतीनिमित्त, अर्थात १४ नोव्हेंबर १९६४ रोजी तत्कालीन राष्ट्रपती एस. राधाकृष्णन यांनी तीन मूर्ती हाऊस हे निवासस्थान देशाला समर्पित केले आणि तिथे नेहरूंच्या संग्रहालयाचे उद्घाटन केले. दोन वर्षांनंतर, १९६६ साली त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी एनएमएमएल अर्थात “नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटी”ची स्थापना करण्यात आली.
मोदी सरकारनं घेतला निर्णय
दरम्यान, आता याच “एनएमएमएल” हे या म्युझियमला दिलेले जवाहरलाल नेहरूंचे नाव वगळण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभरापूर्वी या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान संग्रहालयाचं उद्घाटन केलं होतं. नेहरूंपासून मोदींपर्यंत सर्व पंतप्रधानांविषयी या संग्रहालयात माहिती, दस्तावेज, फोटो ठेवण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने आता या संग्रहालयाच्या नावातून नेहरुंचे नाव काढण्याचा निर्णय झाला आहे. त्याऐवजी आता हे संग्रहालय ‘प्राईम मिनिस्टर्स म्युझियम अँड सोसायटी’ या नावाने ओळखलं जाईल.
सोसायटीचे सदस्य कोण?
पंडित नेहरूंचे नाव वगळण्याचा निर्णय घेणाऱ्या “एनएमएमएल सोसायटी”च्या अध्यक्षपदी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे या सोसायटीचे उपाध्यक्ष आहेत. याशिवाय इतर २९ सदस्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, धर्मेंद्र प्रधान, जी. किशन रेड्डी अशा इतर काही मंत्री व नेत्यांचा समावेश आहे.
यासंदर्भात जारी केलेल्या निवेदनामध्ये उपाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी यामागची भूमिका स्पष्ट केली आहे. “या सोसायटीच्या नव्या रुपात पंडित जवाहरलाल नेहरूंपासून नरेंद्र मोदींपर्यंत देशाच्या सर्व पंतप्रधानांविषयी माहिती देण्यात आली आहे. तसेच, त्यांनी सामना केलेल्या आव्हानांचीही इथे माहिती आहे. पंतप्रधान हे एक पद नसून ती एक स्वतंत्र संस्थाच असते. कोणतेही इंद्रधनुष्य सुंदर दिसण्यासाठी त्यातील सर्व रंगांचे योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व होणे आवश्यक असते ”, असे राजनाथ सिंह यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.