MaharashtraPoliticalUpdate : राज्यातील आघाडीसाठी काँग्रेसची समन्वय समिती जाहीर

मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत समविचारी पक्षांबरोबर निवडणूकपूर्व आघाडीबाबत वाटाघाटी तसेच संभाव्य उमेदवारांबाबत प्राथमिक चर्चा करण्यासाठी प्रदेश काँग्रेसची स्वंतत्र निवडणूक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखालील १७ सदस्यांच्या या समितीत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, आमदार. प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, कोषाध्यक्ष अमरजित मनहास, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे आणि महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे लोकसभा, विधानसभा आणि विधान परिषद निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसचे संसदीय मंडळ असते. परंतु या समितीचे कामकाज प्रत्यक्ष निवडणुका जाहीर झाल्यानंतर सुरू होते. विशेषत: संभाव्य उमेदवारांची प्रदेशस्तरावर निवड करून अंतिम मान्यतेसाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीकडे नावांची शिफार करणे, ही जबाबदारी संसदीय मंडळाची असते. परंतु सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता, तसेच आघाडीच्या राजकारणाच्या अपिरहार्यतेचा विचार करता, प्रदेश स्तरावरही त्याबाबत चर्चा होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रदेश काँग्रेसची स्वतंत्र निवडणूक समिती स्थापन करण्यात आली आहे. समविचारी पक्षांबरोबर निवडणूकपूर्व आघाडीबाबत ही समिती चर्चा करेल, त्यासाठीच राज्यातील वरिष्ठ नेत्यांचा आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचा त्यात समावेश करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.