MaharashtraBudgetUpdate : ‘गाजर हलवा’ : उद्धव ठाकरे , अजित पवार यांची अर्थसंकल्पावर टीका …

मुंबई : शिंदे फडणवीस – सरकारने आज सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ” गाजराचा हलवा ” असे म्हटले आहे तर विरोधी पक्षनेते उद्धव ठाकरे यांनी , हा अर्थसंकल्प वास्तवाचा भान नसलेला असून अर्थसंकल्पातील आकडे म्हणजे हवेचे बुडबुडे आहेत. हा केवळ चुनावी जुमला आहे, अशी टीका केली आहे.
आपली प्रतिक्रिया देताना अजित पवार पुढे म्हणाले की , जयंत पाटील, मी, सुनील तटकरे यांनी आत्तापर्यंत अर्थसंकल्प सादर केलेला आहे. मात्र या अर्थसंकल्पात शब्दांचे फुलोरे, स्वप्नांचे इमले असा हा अर्थसंकल्प आहे. अजित पवार म्हणाले, आज तुकाराम बीज आहे. मात्र देहूसाठी काहीच दिले नाही. शिवाजी महाराजांच्या नावाने मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. मात्र पंतप्रधानांनी भूमिपुजन केलेल्या स्मारकाचे पुढे काय झाले, त्यावर काहीच सांगितले नाही.
आमच्याच पंचसूत्रीचे नाव बदलले…
अजित पवार म्हणाले, या अर्थसंकल्पाला पंचामृत असे नाव दिले आहे. आम्ही सुद्धा महाविकास आघाडीच्या काळात विकासाची पंचसूत्री मांडली होती. आता पंचामृत मांडून केवळ त्यांनी नाव बदलले आहे. जनतेला स्वप्नांच्या दुनियेत फिरवून आणण्याचा प्रयत्न झाला. आम्ही हे देणार, करणार असे म्हटले मात्र किती काय हे सांगितले नाही. शेतकऱ्यांना 6 हजार जाहीर केले आहेत. एका घरात 5 सदस्य आहेत. या रकमेला वाटले तर एकाच्या वाट्याला 3 रुपये येत आहेत. 3 रुपयात चहा तरी येतो का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस यांनी केवळ शब्दांचे इमले बांधलेत, असे पवार म्हणाले.
राज्य कर्जाच्या खाईत
अजित पवार पुढे म्हणाले, महिलांसाठी काही मध्यप्रदेशसारख्या घोषणा होतील असे वाटले होते. मात्र तसे काही झाले नाही. महाराष्ट्रावरील कर्ज साडेसहा लाख कोटीच्या पुढे गेले आहे. त्याबद्दल ते काही सांगायला तयार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही अर्थसंकल्प कसा सादर करणार यावर पुस्तक लिहिले होते. मात्र तो कसा वाचायचा हे त्यांना कळाले नाही.
‘गाजर हलवा’ अर्थसंकल्प… : उद्धव ठाकरे
दरम्यान यावर आपली प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, देवेंद्र फडणवीसांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे दोन शब्दांत वर्णन करायचे त्याचे ‘गाजर हलवा’ अर्थसंकल्प, असे वर्णन करता येईल, अशी टीका केली. विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, मविआ काळात आम्ही दोन ते तीन वेळा अर्थसंकल्प मांडला. तेव्हा कोरोनाचे संकट होते. तसेच, केंद्र सरकारही आमच्या बाजूने नव्हते. त्यामुळे कधीही मागणी केली तरी आमची 25 हजार कोटींहून अधिक जीएसटी थकबाकी असायची. आता केंद्रातील महाशक्तीचा पाठिंबा असलेले सरकार राज्यात आहे. त्यामुळे सरकार चांगला अर्थसंकल्प मांडेल, चांगला कारभार करेल, अशी अपेक्षा होती.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मात्र राज्य सरकार सर्व बाबतीत अपयशी ठरत आहे. मी आजच एक, दोन अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांशी बोललो. अद्याप त्यांच्या बांधावर पचंनामा करण्यासाठी एकही जण गेला नाही. याऊलट या अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांना मधाचा बोट लावण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व समाजघटकांच्या भावनाशी खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
राज्यात सध्या अवकाळी आहे. त्याचप्रमाणे अर्थसंकल्पात केवळ घोषणांचा गडगडाट आहे. प्रत्यक्षात पाऊस झालाच नाही. गरजेल तो बरसेल काय? अर्थसंकल्पात आमच्याच योजना नामांतर करुन पुढे आणल्या आहेत. उदाहरणार्थ मुंबईत आम्ही राबवत असलेली आपला दवाखाना ही योजना आता राज्यभरात राबवण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वारंवार उल्लेख
उद्धव ठाकरे म्हणाले, अर्थसंकल्पात ज्या घोषणा केल्या त्यांची अंमलबजावणी कशी होणार, हा मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना हमखास भाव कसा मिळणार, याबाबत अर्थसंकल्पात कोणतीच वाच्यता नाही. आज अर्थसंकल्पात वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख केला गेला. मात्र, मोदींनी सत्तेत येताच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली होती. त्याला आता 8, 10 वर्षे उलटून गेले आहेत. तरीही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट सोडा किमान हमीभावही मिळत नाही, अशी स्थिती आहे.