IndiaCourtUpdate : मर्जीने लग्न करणे मुलींचा कायदेशीर हक्क , उच्च न्यायालयाने पोलिसांनाही दिले तत्काळ कार्यवाहीचे आदेश …

नवी दिल्ली : मुलींना त्यांच्या मर्जीने विवाह करण्याचा घटनात्मक अधिकार असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. देशातील अनेक मुलींनी मर्जीने लग्न केल्यामुळे अशा नाविवाहितांना ऑनर किलिंगला बळी पडावे लागले आहे. पोलिसांनी अशा प्रकरणात तत्काळ संबंधित जोडप्यांना संरक्षण द्यावे. आपल्या मर्जीने विवाह करणे हा मुलींच्या खासगी स्वातंत्र्याचा भाग असून तो मूलभूत हक्क असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. विवाह करताना आपल्या मर्जीने तो करणे ही गोष्ट भारतीय राज्यघटनेतील कलम २१ या मूलभूत अधिकाराचा भाग असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.
प्रेमविवाह केलेल्या एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची हत्या झाल्याची तक्रार नोंदवत ही हत्या तिच्या कुटुंबियांनी केली असल्याचा आरोप केला होता. आपल्या पत्नीचे अपहरण करून तिला मारहाण करण्यात आल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला. हे अपहरण आणि मारहाण तिच्या कुटुंबियांनीच केल्याचेही या तक्रारीत त्या व्यक्तीने म्हटले होते . पत्नीची हत्या करताना तिच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला असा आरोप त्या व्यक्तीने केला. आपल्या पत्नीने तिच्या घरच्याच्या विरोधात जाऊन आपल्यासोबत लग्न केल्याने तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप या व्यक्तीने केला. या संबंधित एक याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.
या संदर्भात सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, अशा प्रकारच्या घटना घडणे ही बाब आपल्या देशात आता नित्याची झाली आहे. आपल्या मर्जीने विवाह केल्यानंतर त्या मुलीवर अत्याचार केला जातोय. पण एखाद्या मुलीने तिच्या मर्जीने विवाह करणे हा तिच्या मूलभूत हक्काचा भाग आहे. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक मुलीला हा अधिकार दिला आहे.
या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने पोलिसांवर कडक ताशेरे ओढले आहेत. प्रेम विवाह करणाऱ्या किंवा आपल्या मर्जीने लग्न करणाऱ्या जोडप्यांना पोलिसांनी संरक्षण देण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास संबंधित जोडप्यांना त्वरीत संरक्षण देण्याची गरज आहे. प्रेम विवाह केल्यानंतर मुलीला कुटुंबियांकडून धमक्या येत असतील आणि त्याची तक्रार करण्यात आली असेल तर याकडे पोलिस दुर्लक्ष करतात ही गोष्ट दुर्भाग्यपूर्ण आहे.