UddhavThackerayNewsUpdate : फेसबुक लाईव्ह मधून उद्धव ठाकरेंनी घातली शिवसैनिकांना भावनिक साद …

निवडणूक आयोगाच्या कालच्या निर्णयावर आज उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केल्यानंतर आज सायंकाळी फेसबुकवरून राज्यातील शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी “त्रिशुळ, मशाल आणि उगवत्या सूर्याच्या चिन्हाचा पर्याय निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. त्याचसोबत ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना प्रबोधनकार ठाकरे’ आणि ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ अशी तीन नावेही निवडणूक आयोगाला सुचवण्यात आली आहेत,” अशी माहिती देऊन शिवसेनेच्या नावापासून ते आजपर्यंत सर्व घडामोडींचा आढावा घेत बंडखोर नेत्यांचा समाचार घेतला.
आपल्या थेट संवादात ठाकरे पुढे म्हणाले कि , आज देखील अनेक जण भेटतात म्हणतात तुम्ही आमच्या कुटुंबामधील एक सदस्य आहात. आज पुन्हा फेसबुकच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. गद्दारी झाली मुख्यमंत्री पद सोडले तेव्हा पण आपण संवाद केला. सगळं देऊनही गद्दार गेले आता जरा अती होऊ लागलंय. यांना बाळासाहेब ठाकरे पाहिजेत त्यांचा मुलगा मात्र मुख्यमंत्रीपदी नकोय …मलाच मुख्यमंत्री व्हायचयं… इथपर्यंत ठिक होतं, आता शिवसेनाप्रमुख व्हायला चाललेत. दसरा मेळाव्यात विघ्न आणले पण आपला मेळावा झालाच. दोन मेळावे झाले अस म्हणतात एकीकडे पंचतारांकित तर दुसरीकडे निष्ठावंतांचा मेळावा. पण आपल्या मेळाव्याला दिव्यांग, नेत्रहीन सगळे शिवसैनिक होते त्यामुळे त्यांना धन्यवाद करतो. तुम्ही आलात ते का? कारण उध्दव बाळासाहेब ठाकरे म्हणून तुम्ही आलात.
आईच्या काळजात कट्यार घुसवली…
आपल्या भाषणात शिवसैनिकांच्या थेट भावनेला हात घालत त्यांनी शिवसेनेची वाटचाल , शिवसैनिकांचा त्याग याची उजळणी करीत ते म्हणाले कि , “अनेक जणांनी जीव पण गमावले, तुरुंगवास सोसला, पोलिसांशी संघर्ष केला त्यातून शिवसेना नावाचं महावृक्ष उभं राहिला. काल निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह धनुष्य बाण गोठवलं. चाळीस डोक्यांच्या रावणांनी ते चिन्ह गोठवलं. या लोकांच्या वृत्तीची मला चीड आहे. उलट्या काळजाच्या लोकांनी आईच्या काळजात कट्यार घुसवली. पण याचा आनंद त्यांच्या मागच्या महाशक्तीला जास्त होत असेल त्यांना उकळ्या फुटत असतील. कारण त्यांना हे जमलं नाही म्हणून ते शिवसेनेचे लोकं फोडून आनंद घेत आहेत. या देशात हिंदू म्हणायची हिम्मत दिली तीच शिवसेना त्यांनी गोठावली काय आनंद मिळवला? तुमचा आणि शिवसेनेचा संबंध काय? असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला. शिवसेना माझ्या आजोबांनी नाव दिलंय आणि बाळासाहेबांनी ते नाव रुजवलं…”
तुम्हाला सगळं पाहिजे पण बाळासाहेबांचा मुलगा नकोय…
या ४० जणांचा उपयोग झाला की यांना फेकून देतील. मला खात्री आहे सगळेच काही स्वार्थी नाहीत हे दसरा मेळाव्यात सिध्द झालं. इंदिरा गांधीनी जे केलं नाही ते तुम्ही केलंय. तेव्हाही त्रास झालाच पण तेव्हा काँग्रेसचे सरकार होते आज भाजपचे मग जे काँग्रेसने केलं नाही ते तुम्ही करतायेत. ज्यांनी तुम्हाला मोठं केलं त्यांना छळताहेत. मी डगमगलेलो नाही, माझा आत्मविश्वास आहे, तुमच्या सारखे शिवसैनिक आहेत तुम्ही डगमगायचं नाही. माझं आजही आव्हान आहे समोर या निवडणुकांना सामोरे या. तुम्हाला सगळं पाहिजे पण बाळासाहेबांचा मुलगा नकोय.
जनता सर्वोच्च आहे …
दरम्यान, काही काळासाठी पक्षाचं चिन्ह गोठवलं आहे. मला हा निकाल अनपेक्षित होता, १६ आमदारांचा निकाल लागेपर्यंत आयोगाचा निर्णय व्हायला नको होता. माझा कायद्यावर विश्वास आहे. तिथे न्याय मिळेल अशी खात्री आहे आपण तीन चिन्ह दिली आहेत त्रिशूळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल. तीन नावे दिली आहेत, शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आदेशाप्रमाणे चिन्ह आणि नाव दिलंय लवकरात लवकर आम्हाला नाव द्यावे, अशी विनंती देखील उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
दरम्यान, आपण दिलेले पर्याय आयोगाने जाहीर केले पण गद्दारांनी काय दिलंय ते अद्याप सांगितलेलं नाही. जनता सर्वोच्च आहे, आम्हाला त्यांच्या दरबारात जायचं आहे म्हणून निवडणूक आयोगाने लवकरात लवकर आम्हाला चिन्ह आणि नाव द्यावे. आज कोजागिरी आहे रात्र वैऱ्याची आहे जागृत राहा. आज वेळ निघून गेली की कुणी आपल्याला हरवणार नाही.