CongressNewsUpdate : राजस्थानच्या मुख्यमंत्री बदलावरून काँग्रेसमध्ये हालचाली , आज बैठक …

जयपूर/नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर आज जयपूरमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत अशोक गेहलोत यांचा वारसा कोणाकडे सोपवायचा, यावर चर्चा होण्याची शक्यता असून, विधिमंडळ पक्ष आपला नवा नेता निवडण्याची शक्यता आहे. गेहलोत काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास राज्यात नेतृत्व बदल होऊ शकतात, अशी चर्चा असताना ही बैठक बोलावण्यात आली आहे.
रविवारी सायंकाळी ७ वाजता काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला पक्षाचे सरचिटणीस आणि राजस्थान प्रभारी अजय माकन आणि ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. पक्षाचे संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी ट्विट केले की, “२५ सप्टेंबर रोजी राजस्थानमध्ये काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी प्रभारी सरचिटणीस अजय माकन यांच्यासह मल्लिकार्जुन खर्गे निरीक्षक उपस्थित असतील.”
काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक घेण्यापूर्वी गेहलोत यांनी शुक्रवारी स्पष्टपणे सांगितले होते की, ते पक्षाध्यक्षपदाचे उमेदवार असतील आणि मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यास पक्षाच्या विद्यमान अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे प्रभारी अजय माकन याबाबत निर्णय घेतील. दरम्यान , ‘उदयपूर चिंतन शिविर’मध्ये निश्चित केलेली ‘एक व्यक्ती, एक पद’ ही प्रणाली पूर्णपणे लागू होईल, अशी आशा राहुल गांधी यांनी नुकतीच केरळमध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केली होती.
मुख्यमंत्री पदाच्या नावाविषयी अनिश्चितता..
यापूर्वी काँग्रेस अध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जाणारे अशोक गेहलोत यांनी अध्यक्षपद आणि राजस्थानचे मुख्यमंत्रीपद अशी दोन्ही पदे भूषविण्याचे संकेत दिले होते. गेहलोत यांनी नंतर सांगितले की त्यांची टिप्पणी चुकीची आहे.
गेहलोत यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यास त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागू शकते, असे मानले जात आहे, मात्र सचिन पायलट यांना हटवल्यास ते मुख्यमंत्री होतील की नाही किंवा गेहलोत यांच्या पसंतीचा नेता येईल याबाबत अद्याप अनिश्चितता आहे.
दरम्यान काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत या विषयावर काही निर्णय होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले. सूत्रांचे म्हणणे आहे की, शनिवारी अजय माकन यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन राजस्थानशी संबंधित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
दुसरीकडे मुख्यमंत्री होण्याची आशा बाळगून असलेले काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी शुक्रवारी राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सीपी जोशी आणि अनेक आमदारांची जयपूरमध्ये भेट घेतली होती.पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पायलट हे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार आहेत, याशिवाय जोशी यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम असा आहे …
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या जाहीर कार्यक्रमानुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २४ ते ३० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ८ ऑक्टोबर आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास १७ ऑक्टोबरला मतदान होईल आणि १९ ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाईल. दरम्यान, मुख्यमंत्री गेहलोत रविवारी जैसलमेरच्या तनोट मंदिरात प्रार्थना करणार आहेत. ते सकाळी ११.३० वाजता जयपूरहून निघून दुपारी ४.३० वाजता जयपूरला परततील.