ShivsenaNewsUpdate : उद्धव ठाकरेंनी एकाच दगडात मारले दोन पक्षी , शिंदे गटाचा उल्लेख गद्दार आणि “मिंधे गट ” करून अमित शहा यांना दिले ओपन चॅलेंज … !!

मुंबई : शिवसेनेतून बंडखोरी करीत ४० आमदारांसह गेलेले भाजपसोबत गेलेले एकनाथ शिंदे आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाद आणखीनच विकोपाला जातील असे एकूण महाराष्ट्राचे चित्र आहे. आज मुंबईतील गटनेत्यांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकाच दगडात शिंदे गट आणि भाजप असे दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला . आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही थेट शिंगावर घेत तुम्ही आम्हाला जमीन दाखवा आम्ही तुम्हाला अस्मान दाखवू असे आव्हान दिले आहे . शिवाय परंपरेनुसार दसरा मेळावाही शिवतीर्थावरच होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
आपल्या भाषणात सत्ताधारी आघाडीवर जोरदार निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले कि , शिवसेना संपवण्यासाठी हे सगळे आता एकमेकांच्या साथीने उभे राहिले आहेत. भाजपने मुन्नाभाईला सोबत घेतले आहे. गणेशोत्सवात अमित शाह आले होते. आता पंतप्रधान मोदी येणार आहे. या उद्धव ठाकरेंच्या विरोधात हे मोदी, शाह, भाजप आणि आमचे गद्दार मुन्नाभाई एकत्र आले आहेत. यांना शिवसेना संपवायची आहे. उद्धव ठाकरेंना संपुष्टात आणायचे आहे. मात्र, तुम्ही असे होऊ देणार आहात का, अशी विचारणा करत उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले. शिंदे गटाकडून शिवसेनेला संपवण्याचं काम सुरू आहे. ते सगळेजण एकत्र येत आहेत. पण संघर्ष झाला किंवा रक्तपात झाला तर आपल्यात आणि त्या गद्दारांमध्ये होईल, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
आयुष्यातील पहिली निवडणूक समजा…
मध्यंतरी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, ही माझी शेवटची निवडणूक. होय, फडणवीस ही तुमची शेवटचीच निवडणूक आहे. मात्र, शिवसैनिकांनो जे सोडून गेलेत, त्यांचा विचार करू नका. आपल्याला पुन्हा शुन्यापासून सुरुवात करायची आहे, हे इर्षेने निवडणुकीला सामोरे जा. आपल्याकडे काहीच नव्हते आणि आता पुन्हा एकदा सगळे उभे करायचे आहे, या भावनेने निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. गद्दारांच्या आयुष्यातली ही शेवटची निवडणूक आहे आणि आपल्या आयुष्यातील हि पहिली निवडणूक समजा. आपल्याकडे काही नाही. नवीन भगवा लावायचाय. शिवसेनेची प्रत्येक शाखा म्हणजे विश्वास, हिंमत, विकास… शाखाप्रमुख, गटप्रमुख तेथे असलेच पाहिजेत. ढीगभर गद्दारांसोबत असण्यापेक्षा मूठभर निष्ठावंत असले तर कशाची पर्वा नाही. प्रत्येकाच्या हृदयात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. तुमची मनं मेलेली असतील, शिवसैनिकांची नाही. दरम्यान आमच्या वाटेला येण्याचा प्रयत्न करू नका, असे सज्जड इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.
बाप पाळणारी टोळी आलीय …
यावेळी व्यासपीठावरून बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुलं पळवणारी टोळी आपण ऐकली आहे. पण सध्या महाराष्ट्रात बाप पळवणारी अवलादी फिरत आहेत. एवढी वर्षे आपण सर्वांनी ज्यांना सत्तेचं दूध पाजलं, आता त्याच लोकांनी तोंडाची गटारगंगा उघडली आहे. विशेष म्हणजे मुंबईवरती सध्या गिधाडं फिरायला लागली आहेत. त्यांना मुंबई बळकावयाची आहे. त्यामुळे मुंबईवर लचके तोडणारी गिधाडांची अवलाद फिरायला लागली आहे. अमित शाहांवर थेट निशाणा साधताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत-वाचत आम्ही मोठे झालेलो शिवसैनिक आहोत. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर अनेक आदिलशाह, निजामशाह स्वराज्यावर चालून आले होते. त्याच कुळातले आताचे शाह म्हणजे अमित शाह मुंबईवर चालून आले आहेत. देशाचे गृहमंत्री असूनही मुंबईत येऊन ते काय बोलून गेले? तर शिवसेनेला जमीन दाखवा. पण त्यांना माहीत नाही, इकडे जमिनीतून फक्त गवताची पाती उगवत नाहीत, तर तलवारीची पातीही उगवतात. तुम्ही आम्हाला जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच, पण आम्ही तुम्हाला आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे आज मी ठणकावून सागतोय, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
अमित शहा यांचा गिधाड म्हणून उल्लेख…
मी गिधाडं हा शब्द मुद्दाम वापरला आहे, कारण निवडणूक आल्यावर त्यांना मुंबई दिसते. पण जेव्हा मुंबईवर संकटं येतात, तेव्हा ही गिधाडं कुठे असतात? यांच्यासाठी मुंबई ही केवळ विकण्यासाठी मिळालेली स्वेअर फुटातील जमीन असेल. पण ही आमच्यासाठी केवळ जमीन नाही, मातृभूमी आहे. १०५ वीरांनी बलिदान देऊन मिळवलेली मातृभूमी आहे, असं उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले. ते केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करत आहेत. आपल्या काही गद्दारांना त्यांनी सोबत घेतलं आहेत. मुन्नाभाईला सोबत घेतलं आहे. उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंब संपवण्यासाठी हे सगळे एकत्र येत आहेत. पण येथे बसलेलेच माझं कुटुंब आहे, हेच माझं ठाकरे कुटुंब आहे. कारण येथे बसलेल्या प्रत्येकाच्या हृदयात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. तुमची मनं मेली असतील, पण माझ्या शिवसैनिकांची मनं मेली नाहीत. त्यांची मनगटं झिजली नाहीत, अशा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
शिवसेना पक्ष म्हणजे रस्त्यावर पडलेलं झुरळ किंवा ढेकूण नाही…
शिवसेना पक्ष म्हणजे रस्त्यावर पडलेलं झुरळ किंवा ढेकूण नाही, कुणीही आला आणि चिरडून गेला. शिवसेनेच्या वाटेला येण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहात, पण मी सगळ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलंय. कारण संघर्ष झालाच किंवा रक्तपात झालाच, तर हा रक्तपात आपल्यात आणि त्या गद्दारांमध्ये होईल. ते गद्दार आहेत. गद्दारांच्या अंगात गद्दारांचंच रक्त असतं, पण रक्तपात हा शिवसैनिकांचा होईल. कमळाबाईचे कपडे मात्र साफ राहतील, त्यांचा हा डाव मला साधू द्यायचा नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
शिंदे गटाचा उल्लेख ‘मिंधे गट ” …
यावेळी केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले, मी व्यासपीठावर आल्यावर दोन गोष्टी पहिल्या, एक म्हणजे रिकामी खुर्ची जी संजय राऊतांची आहे. यामुळे मी एक खुलासा करून टाकतो, नाहीतर उद्या बातमी यायची संजय राऊत मिंधे गटात गेले. खरं तर, मिंधे सगळे तिकडे गेले आहेत. पण संजय राऊत मोडेन पण वाकणार नाही, या निश्चयाने लढत आहेत. या लढाईत ते आमच्यासोबत असून तलवार हातात घेऊन आघाडीवर लढत आहेत.