India News Update : महाराष्ट्रासह देशात सर्वत्र पीएफआयच्या कार्यालयांवर धाडी, शंभरहून अधिक जणांना अटक…

मुंबई : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया पीएफआय वरील कारवाईचा फास केंद्रीय तपास यंत्रणा एनआयए आणि ईडीने आणखी आवळला असून देशातील १३ राज्यांमध्ये पी एफआयच्या शंभरहून अधिक ठिकाणांवर छापे टाकले आहेत.
महाराष्ट्रात मुंबईसह पुणे, मालेगावमध्ये ईडी आणि एएनआयच्या संयुक्त कारवाईत आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आली आहे. तर, नवी मुंबईतील नेरूळच्या सेक्टर २३ मधील धारावे गावातही एनआयएनं धाड टाकली.
एनआयएच्या टीमनं मुस्लिम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर मध्यारात्री तीनच्या सुमारास ही छापेमारी सुरू केली. तर दुसरीकडे मालेगावातही ईडी, एनआयएने छापा टाकला असून पीएफआय संघटनेच्या सैफुरहेमान य कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
या धडक कारवाई अंतर्गत एनआयए आणि ईडीने आतापर्यंत शंभरहून अधिक जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातल्या पुणे, मुंबईसह २० ठिकाणी एनआयए ईडीने छापे टाकले आहे. तर दिल्ली, एमपी, तामिळनाडू, तेलंगणा, यूपी, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये ही छापेमारी सुरू आहे. पीएफआय कडून अनेक संशयास्पद घटनांचा धोका असल्याचा अलर्ट आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या वादग्रस्त संघटनेची तीन लाख फॅमिली अकाऊंट आहेत. या खात्यांमध्ये फॅमिली मेन्टेनन्सच्या नावाखाली कतार, कुवैत, बहरीन आणि सौदी अरेबियातून ५०९ कोटी रुपये आले आहेत, असा दावाही एनआयएच्या सूत्रांनी केला आहे.