ShivsenaNewsUpdate : दसरा मेळाव्याच्या जागेचा शिवसेनेचा तिढा न सुटल्यास सेनेची राहील हि भूमिका ….

मुंबई : दसरा मेळाव्याच्या जागेवरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगलीच घमासान चालू आहे. दरम्यान शिंदे गटाला एमएमआरडीएच्या बीकेसी मैदानावर दसरा मेळाव्याला परवानगी मिळाली असली तरी त्यांनी शिवतीर्थाच्या जागेची मागणी करणारा अर्ज मागे घेतला नाही आणि महापालिकेने या दोघांच्याही अर्जावर अद्याप निर्णय घेतलेला नसल्याने शिवसेनेची अडचण झाली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र नियोजित जागेवरच शिवसेनेचा दसरा मेळावा होईल असे म्हटले आहे. तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेलाच परवानगी द्यावी असे मत व्यक्त केले आहे.
अर्थात जर शिवाजी पार्कमध्ये परवानगी मिळाली नाही तर इतर पर्यायांची चाचपणीही शिवसेनेने सुरु केली असून याबाबत शिवसेनेने प्लॅन ‘बी ‘ चीही तयार सुरु केली असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला सोडचिट्ठी देत वेगळा गट स्थापन करून भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली आहे. दरम्यान त्यांच्या गटातील बरेच आमदार मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असल्याने त्यांना टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान शिंदे यांच्यासमोर आहे.
शिंदे गट विरुद्ध शिवसेना
सत्ता आणि गट टिकविण्यासाठी दुहेरी जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर असल्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा आणखी एक विस्तार लवकरच होईल असे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असलेल्या याचिकांकडेही शिंदे गटाचे लक्ष आहे. आपला गटच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे आणि सर्वोच्च न्यायालयात केला आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे निर्णय शिवसेनेच्या दोन्हीही गटासाठी महत्वाचे आहेत.
शिवसेनेसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पासून दसरा मेळावा हा सर्वात मोठा आणि महत्वाचा इव्हेन्ट मानला जातो त्यामुळे शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा आहे . मुंबई महापालिकेने शिवाजी पार्क मैदानासाठी परवानगी न दिल्यास शिवसेना थेट न्यायालयाची पायरी चढणार आहे. त्यामुळं दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार अशी ठाम भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. दरम्यान पालिकेने परवानगी नाकारल्यास कायदेशीररित्या काय भूमिका घेता येईल कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला जात असतानाच महापालिकेने जर प्रकरण अधिक ताणले तर उद्धव ठाकरे थेट मैदानात जाऊन मेळावा घेतील, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.