ShivsenaNewsUpdate : आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या वादात बीएमसी आणि एमएमआरडीएसमोर मोठा पेच , दसरा मेळाव्यासाठी जागा द्यायची कुणाला ?

मुंबई : शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वाद थांबायला तयार नाहीत. खरी शिवसेना कुणाची याचा वाद सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असला तरी आता गेल्या दिवसांपासून दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवतिर्थावावर कोणाला परवानगी द्यायची असा पेच मुंबई महापालिकेसमोर निर्माण झाला आहे. एकीकडे मुख्यमंत्री आणि दुसरीकडे माजी मुख्यमंत्री या वादात कोणाला झुकते माप द्यायचे ? याविषयी महापालिका आता कायद्याचा आधार घेत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान भविष्यात हे प्रकरण न्यायालयात गेल्यास आपली बाजू सुरक्षित राहावी यादृष्टीने महापालिका प्रशासनाने सावध पवित्रा घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेनेसाठी परंपरेप्रमाणे शिवतीर्थावर दसरा मेळावा घेणे प्रतिष्ठेचे झाले आहे तर उद्धव ठाकरे यांचे नामोहरण करण्याची एकही संधी शिंदे गटाकडून सोडली जात नाही असे सध्याचे चित्र आहे. शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांच्याही वतीने एकाच जागेवर मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज करण्यात आल्याने मुंबई महापालिकेसाठी यावर निर्णय घेणे मोठी डोकेदुखी झाली आहे . कारण दोन्हीही गट दादरमधील शिवतीर्थावरील जागेसाठी आग्रही आहेत.
दरम्यान शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर काल रात्री अचानक महापालिका जी नॉर्थ ऑफिसमध्ये पोहोचले. यावेळी सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे देखील कार्यालयात हजर झाले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यावरून अनेक चर्चा सध्या सुरु आहेत.
दोन्हीही गटांकडून पर्यायी जगाचा शोध…
दोन्हीही गटांनी शिवाजी पार्कवर परवानगी मिळविण्यासाठी अर्ज केलेले असले तरी दोघांकडूनही पर्यायी जागांचा शोध घेतला जात आहे . विशेष म्हणजे पुन्हा दोन्हीही गटांची नजर बीकेसीच्या मैदानावर असल्याने तिथेही वादाची ठिणगी पेटलेली आहे. या जागेसाठी शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी एमएमआरडीएला पत्र लिहित बीकेसीतील मैदानाची मागणी केली आहे. तर सोमवारी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनीही वांद्रा कुर्ला संकुलाच्या मैदानाचा उल्लेख केला होता. त्यामुळे मुंबई महापालिकेबरोबर एमएमआरडीएसमोरही नेमकी परवानगी कुणाला द्यायची ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.