MaharashtraPoliticalUpdate : महाविकास आघाडीच्या ‘त्या’ १२ आमदारांच्या यादीच्या पत्राचे झाले असे कि ….

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे राजकीय वैर अधिकच वाढत चालले आहे. दरम्यान या संघर्षात मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांची महाविकास आघाडीने पाठवलेली यादी मागे घेण्याची विनंती केली आहे. विशेष म्हणजे राज्यपालांनी ही मागणी मान्य करुन ती यादी मागे घेतली असल्याचे वृत्त आहे.
या बाबत महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी पाठवली होती हि यादी मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पत्र लिहिले होते. महाविकास आघाडीने राज्यपाल कोश्यारींना दिलेल्या पत्रात १२ जागांसाठी २० नावे पाठवली होती परंतु तांत्रिक बाबी किंवा कायदेशीर बाबी दाखवत राज्यपालांनी यादी स्वीकारण्यास नकार दिला होता. यावरून महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यामध्ये मोठा वाद निर्माण झाला होता इतकेच नव्हे तर हे प्रकरण न्यायालयामध्येही गेले होते.
राज्यातील सत्ताबदलानंतर…
दरम्यान राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर महाविकास अगदी सरकारने दिलेली यादी मागे घेण्यात यावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना केली होती. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार राज्यपालांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या मागणीनुसार ही यादी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शिंदे गट आणि भाजपाकडून राज्यपालांना नवी यादी दिली जाणार आहे. म्हणजेच विधानपरिषदेमधील राज्यपाल नियुक्त १२ आमदार कोण असतील हे आता शिंदे गट आणि भाजपा ठरवणार आहे.
यांचे आमदार होण्याचे स्वप्न भंगले…
महाविकास आघाडीच्या वतीने दि. १२ नोव्हेंबर २०२० मध्ये ठाकरे सरकारने १२ नावांची यादी राज्यपालांकडे दिली होती. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून प्रत्येकी चार-चार अशी १२ जणांची नावं राज्यपाल नियुक्त आमदारीसाठी पाठवण्यात आली होती. यात राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे यांचं नाव होते तर काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसैन आणि अनिरुद्ध वनकर यांची नावे देण्यात आली होती. तर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर आणि नितीन बानगुडे पाटील यांची नावे पाठवण्यात आली होती. यापैकी एकनाथ खडसे यांची विधानपरिषेदत एन्ट्री झाली आहे तर काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे.
नव्या यादीत यांच्या नावांची चर्चा…
दरम्यान सरकारमध्ये बदल होताच १२ आमदारांच्या यादीत आपल्याला स्थान मिळावे म्हणून अनेकांनी लॉबिंग सुरु केले आहे. यासाठी मोठी स्पर्धा आहे. लवकरच शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी १२ नावांची यादी राज्यपालांकडे पाठवली जाईल. यामध्ये शिंदे गटाला ४ तर भाजपाला ८ जागा दिल्या जातील असे सांगितले जात आहे.
संभाव्य यादीत शिंदे गटाकडून रामदास कदम, विजय शिवतारे, आनंदराव अडसूळ किंवा अभिजित अडसूळ, अर्जुन खोतकर/ नरेश मस्के, चंद्रकांत रघुवंशी, राजेश क्षीरसागर तर भाजपकडून हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ, पंकजा मुंडे, कृपाशंकर सिंग, गणेश हाके, सुधाकर भालेराव यांचा समावेश असल्याची चर्चा आहे.