SanjayRautNewsUpdate : राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ सर्वत्र निदर्शने , उद्धव ठाकरेंची कुटुंबियांना भेट…

मुंबई : मुंबईतील ‘चाळी’च्या पुनर्विकासातील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने काल रात्री उशिरा प्रदीर्घ चौकशीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक केली. आज ईडीकडून सत्र न्यायालयात राऊत यांना हजर केले जाणार आहे. दरम्यान, सत्र न्यायालय आणि रुग्णालयाभोवती सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. शिवसैनिकांचा विरोध पाहता प्रशासनाने ही तयारी केली आहे.
दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या भांडुपमधल्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी राऊतांच्या आईची भेट ठाकरेंनी घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसंच काळजी करू नका, शिवसेना तुमच्यासोबत आहे, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. या भेटीनंतर आता काही वेळातच उद्धव ठाकरे मातोश्रीवरुन राऊतांच्या अटकेवरुन भूमिका मांडणार आहेत.
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी ईडीचे कार्यालय, जेजे रुग्णालय आणि मुंबईतील सत्र न्यायालय येथे सुमारे 200 पोलीस तैनात केले आहेत. ईडी कार्यालयाबाहेर १०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, तर जेजे रुग्णालयाबाहेर ५० सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सत्र न्यायालयाजवळही जवळपास ५० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ईडीने काल (रविवार) पहाटे संजय राऊत यांच्या घरावर छापा टाकला होता, जो संध्याकाळी चारपर्यंत चालला होता. यानंतर ईडीने राऊतला ताब्यात घेतले, त्यानंतर रात्री १२ वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरू ठेवली आणि रात्री १२.४० च्या सुमारास राऊतला अटक केली.
संजय राऊत यांच्या घरातून बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच अनेक कागदपत्रेही ईडीच्या हाती लागली आहेत. पक्षाने आपल्या नेत्याच्या अटकेविरोधात मुंबई आणि इतर शहरांमध्ये निदर्शने केली आहेत. केंद्र सरकार उद्धव ठाकरे टीम कमकुवत करत असल्याचा आरोप पक्षाने केला आहे.