MaharashtraPolitical Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मध्यरात्रीच्या मेळाव्यात पक्ष प्रमुखांवर आरोपांची आतषबाजी…

मुंबई : मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरात मध्यरात्री १ च्या सुमारास आमदार संजय शिरसाट यांनी आयोजित केलेल्या शिवसैनिक मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे थेट नाव न घेता विविध आरोप करीत टीकेची आतषबाजी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, की सरकारमध्ये होतो, मुख्यमंत्री आपला होता तरीही अपेक्षेप्रमाणे कामे झाली नाहीत. निवडणुकीत चौथ्या नंबरवर शिवसेना गेली. ज्या सरकारमध्ये शिवसेना आहे त्यात शिवसैनिकांना काय मिळालं? असे एक ना अनेक प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केले.
आपल्या भाषणात शिंदे पुढे म्हणाले की, जे आमच्यासोबत आले त्यांचा वैयक्तिक स्वार्थ नाही. तर त्यांची बांधिलकी मतदारसंघाशी आहे. मतदारसंघात कामे करायची असतील तर निधी हवा असतो. मतदारांना सामोरे जायचे आहे. त्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत. मात्र, अनेक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले गेले. अधिकार असताना, सरकार असताना आम्हाला शिवसैनिकांना मदत करता आली नाही, असेही ते म्हणाले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब म्हणाले होते, सत्तेत असताना शिवसैनिकाच्या केसाला धक्का लागता कामा नये. हाच संदेश घेऊन आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला पुढे घेऊन जाण्याचे काम करीत आहोत. मी माझ्या पक्षाचा काँग्रेस होऊ देणार नाही, असे बाळासाहेब म्हणाले होते. तेच विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रत्यक्ष नाव न घेता शिंदे म्हणाले कि , मी धर्मवीर आनंद दिघे सिनेमा काढला. तुम्हाला आवडला पण काही लोकांना पचला नाही. त्याचाही राग होता. कुणाला आवडो किंवा न आवडो, मी पर्वा करत नाही. धर्मवीर आनंद दिघेंसाहेबांनी बाळासाहेंबांना गुरू मानले. आज आम्ही बाळासाहेबांचे, धर्मवीरांचे विचार घेऊन पुढे चाललो आहे. आम्ही हा निर्णय का घेतला त्याचं आत्मपरिक्षण करण्यापेक्षा गद्दार, बंडखोर म्हटले जाते . हा बंड नाही, उठाव आहे, क्रांती आहे.