MaharashtraRainUpdate : राज्यात सर्वत्र पावसाचा धुमाकूळ , ८० जणांना गमवावा लागला जीव …

मुंबई : पावसाने राज्यात सर्वत्र धुमाकूळ घातला असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. दरम्यान हवामान खात्याकडून पुढचे दोन दिवस असाच पाऊस राहिल असा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत १४ जुलैपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट असून यासोबतच पालघर, नाशिक, पुणे यासह ४ जिल्ह्यांमध्ये १५ जुलै या कालावधीत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे चाकरमान्यांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे हवामान विभागाचे प्रमुख केएस होसलीकर यांनी ट्वीट करत मुंबईसह ठाणे रायगड आणि पालघर भागात जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती दिली. ”ताज्या सॅटेलाईट आणि रडारचे निरीक्षण केल्यास मुंबईसह ठाणे रायगड आणि पालघर भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढचे काही तास या भागांत जोरदार पाऊस पडेल.” असे ट्वीट केएस होसलीकर यांनी केले आहे. मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस कायम असून, मंगळवारपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. दरम्यान, पालघरमध्ये भूस्खलन होऊन अनेक लोक अडकल्याची बातमी आहे. वसई परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली. इथे घरांचे नुकसान झाले असून अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. आतापर्यंत दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
पालघर जिल्ह्यात मंगळवारी संपलेल्या २४ तासांत १०९.९ मिमी पाऊस झाला. पालघर जिल्ह्यात खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात मंगळवारी संपलेल्या २४ तासांत १०६.३ मिमी पाऊस झाला. गोदावरी नदीची पाणीपातळी वाढल्यानंतर जलसंपदा विभागाने नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून २८४.१६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. नाशिक जिल्ह्यातील 70 आणि गडचिरोली जिल्ह्यातील 25 जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
#MumbaiRains 13 Jul, 5.45 am.
Mod intensity rainfall likely to continue for next 2,3 hrs over Mumbai, Thane and parts of Raigad and Palghar, as per the latest radar and satellite obs.
Morning wala pl watch. pic.twitter.com/Y49KOrxlUN— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 13, 2022
जायकवाडी धरणाच्या साठ्यात होते आहे वाढ…
नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणातील पाणी साठ्यात गेल्या चोवीस तासात तब्बल ६ टक्क्यांनी वाढ झालीय. काल जायकवाडी धरणात ३७.११ टक्के इतका पाणीसाठा होता. मात्र त्यात आज वाढ होऊन धरणाचा पाणीसाठा ४३.२५ टक्क्यावर पोहोचलाय.
नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली असून पूरग्रस्त भागातून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत नाशिक शहरात २४ तासांत ९७.४ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यातील सप्तशृंगी मंदिराजवळ सोमवारी जोरदार पाऊस झाला. मंदिराच्या पायऱ्यांवर पाणी साचल्याने सहा भाविक किरकोळ जखमी झाले.
८० हून अधिक जणांना गमवावा लागला जीव…
येत्या १५ जुलैपर्यंत राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून कोकण , मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता गृहीत धरून ‘आयएमडी’तर्फे या दोन विभागांना पुढील दोन दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. दरम्यान हवामान खात्याने महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत रेड अलर्ट तर सहा जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसानंतर मुंबईत हाय टायड अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात जूनपासून अतिवृष्टीमुळे ८० हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला असून समुद्रकिनारी जाण्यासाठीही बंदी घालण्यात आली आहे.
नागपुरात स्कॉर्पिओला वाहून गेली, तीन ठार, तीन बेपत्ता
नागपुरात एक स्कॉर्पिओ वाहून गेल्याने तिघांचा मृत्यू झाला असून तीन जण बेपत्ता आहेत. सर्व प्रवासी मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. या घटनेबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून एनडीआरएफकडूनही मदत घेतली जात आहे.
दरम्यान मराठवाडा १३ ते १५ जुलैपर्यंत मराठवाड्यालाही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे सर्वत्र पाऊस होऊन अनेक गावांमध्ये नद्यांना पूर येण्याचा धोका आहे. तर मुंबई आयमडीकडून पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातसुद्धा १३ ते १५ जुलैपर्यंत रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.