MaharshtraPoliticalUpdate : दिल्ली दौऱ्यात कोणतीही राजकीय चर्चा नाही , सदिच्छा भेटी होत्या : देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संयुक्तरित्या दौरा करीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंतप्रधानांसह , राष्ट्रपती , गृहमंत्री , संरक्षणमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घालून दिली. मात्र हा दौरा केवळ सदिच्छा दौरा होता. या दौऱ्यात मंत्रिमंडळावर कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
या दौऱ्याच्या यशस्वीतेबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले कि , काल आणि आजच्या दिल्ली दौर्याचा कोणताही राजकीय अजेंडा नाही. आमच्या ज्येष्ठ नेत्यांच्या सदिच्छा भेटी घेत आहोत. या दौऱ्यात आम्ही राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री राजनाथसिंग यांच्या भेटी घेतल्या. तर दुपारी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले आणि पुढील व्हिजन विषयी त्यांचे मार्गदर्शन घेतले. आम्ही उपराष्ट्रपतींची सुद्धा वेळ मागितली होती परंतु ते सध्या कर्नाटक दौर्यावर असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. मात्र आम्ही त्यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. पुढच्या काळात निश्चितपणे वेळ देण्याचे त्यांनी आश्वस्त केले आहे.
मला माझ्या पक्षाने मोठे केले : फडणवीस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले कि , मला माझ्या पक्षाने मोठे केले. त्यांनी मुख्यमंत्रीपदापर्यंत मला संधी दिली. माझ्यासाठी पक्षाचा आदेश हा नेहमीच महत्त्वाचा होता, आहे आणि राहील त्यामुळे मी हे पद पक्षाचा आदेश म्हणून स्वीकारले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार यशस्वी व्हावे, हाच आमचा प्रयत्न राहणार आहे. खरी शिवसेना ही हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे आणि त्याच शिवसेनेसोबत आम्ही युती केली आहे.
पंतप्रधानांचे मानले आभार
आपल्या दौऱ्याचे कारण सांगताना ते पुढे म्हणाले कि , दिल्ली दौर्यात खातेवाटप किंवा तत्सम विषयांवर कोणतीही चर्चा झालेली नाही. आषाढी एकादशीची पूजा आटोपल्यानंतर मुख्यमंत्री मुंबईत आले की यासंदर्भात आम्ही एकत्रित बसून चर्चा करू. यावेळी त्यांनी , देहू येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिराला नुकत्याच भेट दिल्याबद्दल तसेच महाराष्ट्राच्या भविष्यातील विकासाच्या रोड मॅपवर मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल आणि भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भेटीबद्दल आणि पाठिंब्याबद्दल आभार मानले . महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत राहतील तसेच माझे सरकार नियोजित कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला. आपल्या भेटीचा फोटोही शिंदे यांनी ट्विट केला असून यामध्ये ते पंतप्रधानांसोबत हसताना दिसत आहेत. आजच्या भेटीत त्यांनी सर्व मान्यवरांना विठ्ठल-रखुमाईच्या भेटी दिल्या.