WorldNewsUpdate : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार

टोकियो : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर शुक्रवारी नारा भागातील एका कार्यक्रमात गोळ्या झाडण्यात आल्याचे वृत्त आहे. हल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक माध्यमांकडून ही माहिती समोर येत आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.
सार्वजनिक प्रसारक एनएचके आणि क्योडो वृत्तसंस्थेने सांगितले की, माजी नेता रविवारच्या निवडणुकीपूर्वी एका कार्यक्रमात भाषण देत असताना त्यांच्यावर हा गोळीबार झाला. ६७ वर्षीय अबे कोसळले आणि त्यांच्या मानेतून रक्तस्त्राव झाला. त्यांच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षातील एका सूत्राने जीजी वृत्तसंस्थेला सांगितले. एलडीपी किंवा स्थानिक पोलीस या दोघांनाही याचा सुगावा लागला नाही.
Former Prime Minister Shinzo Abe has been shot in the city of Nara, reports Japan's NHK. pic.twitter.com/pw4TyCdArl
— ANI (@ANI) July 8, 2022
अनेक प्रसारमाध्यमांनी असे वृत्त दिले की कदाचित त्याला मागून बंदुकीने गोळी घातली गेली असावी. पब्लिक ब्रॉडकास्टर एनएचकेने सांगितले की, एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, गोळीबार करणाऱ्यांबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
भारताशी मैत्रीचे संबंध
शिंजो अबे यांनी प्रकृती अस्वास्थामुळे २०२० मध्येच जपानच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी उपचाराअभावी पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळता येणार नसल्यामुळे शिंजो अबे यांनी जनतेची माफी मागत राजीनाम्याची घोषणा केली होती. शिंजो अबे हे जपानच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहिलेले पहिलेच पंतप्रधान आहेत. भारत आणि जपान यांच्यातील संबंध वृद्धिगंत करण्यास शिंजो अबे यांचा मोठा वाटा आहे. तसेच, २०१७ मध्ये जपानचे पंतप्रधान असताना शिंजो अबे हे भारतात आले होते. त्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद विमानतळावर त्यांचे स्वागत केले होते. शिंजो अबे यांची गळाभेट घेत नरेंद्र मोदींनी त्यांचे स्वागत केले होते. भारताने शिंजो अबे यांचा पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.