ShivsenaNewsUpdate : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आता नगरसेवकांवर लक्ष , पक्ष टिकवण्याचे ठाकरेंसमोर मोठे आव्हान …

मुंबई : आमदारांच्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष पक्षाच्या खासदारांबरोबर ठाणे, नवी मुंबईनंतर आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील नागरसेवकांकडे लागले आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांना आपल्याकडे वळते करून घेण्याला किंवा आता पुन्हा बंडखोरी होणार नाही या दृष्टीने दोन्हीही गट सक्रिय झाले आहेत.
दरम्यान कल्याण-डोंबिवली या महानगरपालिकेतील शिवसेनेच्या ४० नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीअसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता कल्याण-डोंबिवलीमध्येही स्थानिक पातळीवर शिवसेनेला खिंडार पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देत कल्याण, डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील बहुतांश सर्व नगरसेवक आणि नगरसेविका तसेच शिवसेना, युवासेना व महिला आघाडी पदाधिकारी आणि शिवसैनिक व युवसैनिकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून महाराष्ट्राचा विकास रथ प्रगतीपथावर नेण्याचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे सांगितले.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेचे एकूण ५४ नगरसेवक असून त्यातील ४० नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, शिंदे गटाची ताकद वाढत असून शिवसेना पक्षाची वाताहात सुरू आहे. पक्षाची गळती रोखण्याचे मोठे आव्हान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. या अगोदर ठाणे आणि नवी मुंबईतही शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत.