NashikNewsUpdate : अफगाणी सुफी धर्मगुरूची गोळ्या झाडून हत्या, एकाला ताब्यात घेतले

नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील चिंचाेडी एमआयडीसी परीसरात काल रात्री आठ वाजेच्या सुमारास एका अफगाण सुफी सय्यद नांवाच्या व्यक्तीची अज्ञात व्यक्तीनी गाेळ्या झाडुन हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नाशिकचे ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा ड्रायव्हर आणि तीन साथीदारांनी हा खून केला होता. गोळीबार झाला तेव्हा तो येवला शहरात होता, पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.
https://twitter.com/ANI/status/1544565207653298176
या विषयी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , येवला तालुक्यातील चिचोंडी एमआयडीसी परिसरात निर्वासित म्हणून राहणाऱ्या एका अफगाणी सुफी युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती असे या अफगाणी नागरिकाचे नाव आहे. सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती हा अफगाण धर्मगुरू असल्याची प्राथमिक माहिती असून आर्थिक वादातून हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय व्यक्त केला आहे. तर घटनेच्या दरम्यान गोळीबाराचा आवाज आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेत दोघांना पकडले मात्र चौघेजण यातून निसटले आहेत.
गाेळ्या झाडुन हत्या केल्यानंतर सदर अज्ञात मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून चार चाकी वाहनाने पळ काढला असल्याचे पाेलिसांनी सांगितले. सदर घटनेची माहिती मिळताच येवला शहर पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक भगवान मथुरे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, उपनिरीक्षक मनाेहर माेरे, आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. तसेच पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान चिंचोडी परिसरात रात्री उशिरा फॉरेन्सिक लॅबतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. दरम्यान चिचोंडी एमआयडीसी परिसरात अज्ञात व्यक्तीचा खून झाल्याची माहिती पोलिस पाटील वनिता मढवई यांनी येवला शहर पोलिसांना दिली असुन वरीष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली असुन तात्काळ चाैकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित अफगाण नागरिकाची माहिती घेण्यात येत असून नेमका खून कोणत्या कारणांसाठी झाला याची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. सदर घटनेतील अफगाणी नागरिक हा सिन्नर तालुक्यातील वावी परिसरामध्ये मिरगाव येथे दीड वर्षांपासून राहत असल्याची माहिती आहे.