Aurangabad Crime Update : खंडपीठाचे सहप्रबंधकाची फसवणूक करण्याचा प्रयत्न भामट्याविरूध्द गुन्हा दाखल

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती दिपांकर दत्ता यांच्या नावाने बनावट व्हॉटसअप खाते तयार करून त्यावर न्या. दत्ता यांचा फोटो डीपीला ठेवून औरंगाबाद खंडपीठाच्या सहप्रबंधकाची भामट्याने फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुदेश श्रीनिवास कानडे हे प्रशासन विभागात सहप्रबंधक म्हणून कार्यरत आहेत. २५ जून रोजी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास भामट्याने बनावट व्हॉटसअप खात्याच्या सहाय्याने सुदेश कानडे यांच्या मोबाईलवर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती दिपांकर दत्ता यांच्या नावाने संदेश पाठविला होता. सुदेश कानडे यांना संशय आल्याने त्यांनी याबाबतचा लेखी अहवाल मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे प्रबंधक आनंद लक्ष्मीचंद यावलकर (वय ४७,रा.अमृतवेल, स्नेहनगर) यांच्याकडे दिला होता.
आनंद यावलकर यांनी कानडे यांच्या मोबाईलवर आलेल्या संदेशाची पडताळणी केली असता तो बनावट असल्याचे निदर्शनास आले. आनंद यावलकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मोबाईल क्रमांक (६३९६८५१२६४) च्या धारकाविरूध्द पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे करीत आहेत.